पणजी : गोव्यात सुरु असलेल्या ब्रिक्स परिषदेत भारत आणि रशिया या दोन देशांमध्ये तब्बल 16 करार झालेत. भारत-रशियामध्ये झालेल्या महत्वाच्या करारात संरक्षण, पायाभूत सुविधा, विज्ञान, रिसर्च, अंतराळ संशोधन आदींचा समावेश आहे.
ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. त्यानंतर दोन्ही देशांतील 16 महत्त्वपूर्ण करारांची घोषणा करण्यात आली.
भारताने रशियाकडून S-400 ट्रीम्फ (Triumf) हे मिसाइल सिस्टम घेण्याचे ठरवले आहे. याशिवाय भारतात कामोव हेलिकॉप्टर्सची निर्मित करण्याबाबतही संमती दर्शवण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रात भागीदारी मजबूत करण्यासाठी दोन्ही देश लष्करी उद्योगसंदर्भातील वार्षिक परिषदही घेतील, असे यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
दरम्यान, S-400 ट्रीम्फ मिसाइल सिस्टमची 400 किलोमीटरपर्यंतच्या हवाई कक्षेत मारा करण्याची क्षमता आहे. या कराराची किंमत पाच मिलियन डॉलर एवढी आहे. तर दोन्ही देशांनी दहशतवादाविरोधातील एकमेकांच्या भूमिकांचे समर्थन केले आणि विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.