पाकिस्ताननं केली ११ भारतीय नागरिकांची येमेनमधून सुटका

येमेनमधील युद्धग्रस्त भागात अडकलेल्या ११ भारतीयांसह ३५ विदेशी नागरिकांची पाकिस्तानच्या नौदलानं सुटका केली आहे. पाकिस्तान नौदलाच्या या बचावकार्यामुळं भारत - पाकमधील तणाव कमी होण्यास हातभार लागेल. 

Updated: Apr 5, 2015, 01:08 PM IST
पाकिस्ताननं केली ११ भारतीय नागरिकांची येमेनमधून सुटका  title=

नवी दिल्ली: येमेनमधील युद्धग्रस्त भागात अडकलेल्या ११ भारतीयांसह ३५ विदेशी नागरिकांची पाकिस्तानच्या नौदलानं सुटका केली आहे. पाकिस्तान नौदलाच्या या बचावकार्यामुळं भारत - पाकमधील तणाव कमी होण्यास हातभार लागेल. 

येमेनमधील मुकल्ला  शहरावर अल कायदाच्या दहशतवाद्यांनी ताबा मिळवला असून या शहरात पाकिस्तानचे १४८ नागरिक अडकले होते. या नागरिकांच्या सुटकेसाठी पाकिस्तान नौदलाचं पीएनएस अजलत हे जहाज मुकल्ला इथं रवाना झालं होतं. शुक्रवारी हे जहाज मुकल्लाजवळ पोहोचलं होतं. मात्र मुकल्ला बंदराकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आल्यानं पाक नौदलानं बचाव मोहीमेत बदल केला. 

मुकल्ला ऐवजी हे जहाज अश शिहर बंदराकडे वळवण्यात आलं आणि तिथून १४८ पाकिस्तानी नागरिकांची सुटका करण्यात आली. नौदलाच्या जवानांनी पाकच्या नागरिकांसोबत ३५ परदेशी नागरिकांची सुटका करुन माणूसकीचं दर्शन घडवलं. ३५ परदेशी नागरिकांमध्ये भारताच्या ११, चीनच्या ८ तर ब्रिटनच्या ४ नागरिकांचा समावेश असल्याचे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं.

हे जहाज आता पाकच्या दिशेनं रवाना झालं असून ७ एप्रिल रोजी हे जहाज कराचीत पोहोचेल, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.