नवी दिल्ली : आता प्रत्येकाला आपला प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफचे ऑनलाईन पैसे काढता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार नाही.
अनेकवेळा पीएफ काढण्यासाठी कसरती कराव्या लागतात. तर कधी लालफितीचा कारभारामुळे पीएफ काढण्यासाठी कटकट करावी लागते. मात्र, ही कटकट आता लवकरच संपणार आहे. मार्च २०१६ पर्यंत ऑनलाईन पीएफ काढण्याची व्यवस्था पूर्ण होईल, असा विश्वास एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने केलाय.
ऑनलाईन सुविधा उपलब्ध झाल्यानंतर जवळपास ५ कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल. ऑनलाईन प्रक्रियेमुळे तुम्हाला एक दिवसात पैस मिळू शकतील. पीएफ काढण्याचा अर्ज ईपीएफओकडे प्राप्त झाल्यानंतर तीन तासांच्या आत कर्मचाऱ्याच्या खात्यावर पीएफची जी काही रक्कम आहे ती जमा होणार आहे.
कामगार मंत्रालयाने पीएफची रक्कम ऑनलाईन काढण्याबाबतचे पत्र लिहिलेय. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, जनधन योजना यांच्यासह निवृत्त वेतन या योजनांसाठी आधार कार्डची जोडणी ऐच्छिक असल्याचा निर्णय दिल्यामुळे या प्रक्रियेला अधिक गती मिळणार आहे. त्यामुळे २०१६ पर्यंत पीएफची रक्कम ऑनलाईन काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.