www.24taas.com, नवी दिल्ली
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची १० जनपथवर भेट घेतली. त्यांच्यासह सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल हेदेखील त्यांच्यासोबत होते.
महाराष्ट्र प्रदेश आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे. तसंच राज्यातल्या मंत्रिमंडळातल्या फेरबदलाबाबतही चर्चा झाल्याचं सूत्रांचं म्हणणंय. तर आज संध्याकाळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी केंद्रातल्या फेरबदलांबाबत पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेस सरकारमधून बाहेर पडल्यामुळं तब्बल सहा मंत्रिपदं रिक्त झालेली आहेत. या रिक्त जागांवर काही नवीन चेह-यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर काही संघटनेतल्या नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात या आठवड्यात फेरबदलाचे संकेत मिळाले असून मंत्रिमंडळात नव्या चेह-यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यात महाराष्ट्रातून विलास मुत्तेमवार आणि गुरूदास कामत यांचं नाव आघाडीवर आहे. त्यांच्याप्रमाणे राष्ट्रवादीचे खासदार तारिक अन्वर, अभिनेता ते नेता असा प्रवास करणारे चिरंजिवी, राष्ट्रवादीचे खासदार तारिक अन्वर, काँग्रेस नेते मनिष तिवारी, मध्यप्रदेशातील मदसौरच्या खासदार मिनाक्षी नटराजन, राजस्थानच्या निगोरच्या खासदार ज्योती मिर्धा यांच्या नावांचा समावेश होण्याची शक्यता आहे. पार्टीत प्रवक्तेपदाची जबाबदारी सांभाळणारे जनार्दन द्विवेदी आणि अभिनेते चिरंजीवी यांना देखील सरकारमध्ये स्थान मिळू शकतं. सूत्रांच्या माहितीनुसार, ही नावं चर्चेत असली, तरी ऐनवेळी बद होऊन नव्या नावांचाही विचार होऊ शकतो.