उद्योजकांचं 'कर्ज' फेडण्यासाठीच भूसंपादन विधेयक, राहुल गांधींची टीका

 दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या काँग्रेसच्या किसान रॅलीत राहुल गांधीसह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी, पंतप्रधान मनमोहन सिंग  आणि भाजप सरकारवर टीकेची झो़ड उठवली. सुमारे दोन महिन्यांच्या सुटीनंतर भारतात परतलेल्या राहुल गांधींनी यावेळी भूमिअधिग्रहण मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलंच तोंडसूख घेतलं.

Updated: Apr 19, 2015, 07:28 PM IST
उद्योजकांचं 'कर्ज' फेडण्यासाठीच भूसंपादन विधेयक, राहुल गांधींची टीका title=

नवी दिल्ली:  दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या काँग्रेसच्या किसान रॅलीत राहुल गांधीसह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी, पंतप्रधान मनमोहन सिंग  आणि भाजप सरकारवर टीकेची झो़ड उठवली. सुमारे दोन महिन्यांच्या सुटीनंतर भारतात परतलेल्या राहुल गांधींनी यावेळी भूमिअधिग्रहण मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलंच तोंडसूख घेतलं.

 मोदींनी मोठमोठ्या उद्योगपतींकडून कर्ज घेऊन लोकसभा निवडणूक लढवली. आता या कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांची जमीन उद्योजकांच्या घशात घालण्याचा मोदींचा डाव असल्याचा आरोप राहुल यांनी केला. मोदींच्या धोरणामुळं शेतकरी आणि कामगार वर्ग घाबरला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. 

देशाच्या विकासासाठी मेक इन इंडिया आणि उद्योग क्षेत्राच्या विस्ताराची आवश्यकता आहेच पण त्यासोबत शेतकरीही तितकाच आवश्यक आहे. हरित क्रांतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी देशाच्या विकासाचा पाया रचला होता. मात्र मोदी हा पाया कमकुवत करत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला. 

केंद्र सरकार फक्त श्रीमंत आणि उद्योजकांसाठीच काम करत असल्याचं शेतकऱ्यांना वाटत असून त्यांची जमीन कधीही हिसकावून घेतली जाईल अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे, असं त्यांनी सांगितलं. मोदी शेतकऱ्यांना त्यांची जमीन उद्योजकांना विकण्यासाठी भाग पाडत आहे. 

यूपीए सरकारचं भूसंपादन विधेयक शेतकरी हिताचं होतं असंही राहुल गांधी म्हणाले. तर मोदी सरकारनं खोटी आश्वासनं देऊन सत्ता मिळवली असून गेल्या ११ महिन्यांत सरकारनं नेमकं काय केलं असा सवाल सोनिया गांधी यांनी उपस्थित केला. 

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या रॅलीवर टीका केलीये. ही शेतकऱ्यांची सभा नव्हती तर सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते होते. काँग्रेस विकासाला विरोध करतेय, असा हल्लाबोल गडकरींनी केला. 

तर किसान रॅलीत भूमी अधिग्रहणावरुन  नरेंद्र मोदींवर टीक करणाऱ्या राहुल गांधींना भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वींनी होमवर्क करण्याचा सल्ला दिलाय तर प्रदिर्घ सुट्टीनंतर  राहुल गांधी नवीन अॅडवेंचर शोधत असल्याची टीका आपच्या कुमार विश्वास यांनी केलीये.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.