नवी दिल्ली : रोहित वेमुला प्रकरणाचे राज्यसभेत तीव्र पडसाद उमटले. रोहित आत्महत्या प्रकरणावरून बसपा अध्यक्षा मायावती आणि मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
स्मृती इराणी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी मायावती यांनी केली. तसंच चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीत दलित न्यायाधिशाचीही नेमणूक करण्यात यावी अशी मागणी मायावतींनी केली. तर चर्चेची तयारी दर्शवत मायावतींच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीही सज्ज असल्याचं इराणींनी सांगितलं.
जर उत्तरानं समाधान झालं नाही तर गळा चिरून हाती देईन, असं भावनिक युक्तीवाद स्मृती इराणींनी केला. मात्र विरोधकांनी घोषणाबाजी करत इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. वादळी चर्चेचं पर्यवसान गोंधळात झाल्यामुळं काही वेळासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं.
प्रश्नकाल संपल्यानंतर लगेचच विरोधकांनी वेमुला प्रकरणावरून सरकारला घेरलं. त्यामुळं वारंवार कामकाज तहकूब करावं लागलं. दरम्यान रोहित वेमूला आणि जेएनयू प्रकरणाची स्वतंत्र चर्चा घ्या अन्यथा राज्यसभा चालू देणार नाही असा पवित्रा मायावतींनी घेतलाय.