मुंबई : जगभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेले शिर्डीचे साईबाबा यांच्या धर्मावरून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलंय. साईबाबा मुस्लिम फकीर होते. त्यामुळं त्यांची हिंदू पद्धतीनं पूजाअर्चा करणं योग्य नाही, असं वक्तव्य दंडी स्वामी गोविंद सरस्वतींनी केलंय. याआधी द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनीही साईबाबांची पूजा करू नका, असं फर्मान सोडलं होतं. आता त्यांचेच शिष्य असलेल्या दंडी स्वामींनी थेट साईबाबा मुस्लिम होते, असा दावा केलाय.
'सबका मालिक एक' अशी सर्वधर्मसमभावाची शिकवण देणा-या शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी दररोज हजारो भाविक लीन होतात. अगदी बडे बडे सेलिब्रिटीही शिर्डीला साईंच्या दरबारात येऊन समाधीचं दर्शन घेतात. 450 कोटी रूपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या श्री साई शिर्डी संस्थानची बँक खाती 15 कोटींच्या ठेवींनी भरली आहेत. मंदिराकडं तब्बल 300 किलो सोनं असून, संस्थानच्या कारभाराबाबत याआधीही अनेक वाद निर्माण झालेत. मात्र श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईंच्या धर्मावरून आता हा नवाच वाद सुरू झाला आहे.