नवी दिल्ली : काश्मीरवर नको, दहशतवादावर चर्चा करा, असं भारताकडून पाकिस्तानला सांगण्यात आलं आहे. काश्मीरवर चर्चा करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने भारतासमोर ठेवला होता, तो फेटाळून लावताना भारताने पाकिस्तानला दहतवादावर चर्चा करा, काश्मीरवर नको असं म्हटलंय.
पाकिस्तानने काश्मीर मुद्यावर परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चेचा दिलेला प्रस्ताव बुधवारी भारताने फेटाळून लावला. काश्मीरवर नाही पण सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाच्या मुद्यावर चर्चा करा, ही काश्मीरमधली सद्यस्थितीमधील मुख्य समस्या आहे, असे भारताने म्हटले आहे.
जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय आहे असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्त गौतम बामबावले यांनी भारताचे उत्तर पाकिस्तानला कळवले आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव अझीझ अहमद चौधरी यांच्या निमंत्रणावर भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी इस्लामाबादला जाण्याची इच्छा व्यक्त केली.
काश्मीर मुद्यावर तोडगा काढणे दोन्ही देशांचे कर्तव्य आहे असे पाकिस्तानने निमंत्रण देताना म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात बलुचिस्तानचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पाकिस्तानने लगेच भारताला काश्मीर मुद्यावर चर्चेचे निमंत्रण दिले होते.