बिजिंग : आजपर्यंत रक्तदान, नेत्रदान, हृदय प्रत्यारोपण एकले असेल. पण संपूर्ण शरीर दान करून ते दुसऱ्याच्या देहाला लावणे शक्य आहे का? चीनमध्ये एक ऑर्थोपेडिक सर्जन (हाडांचे सर्जन) या दिशेने काम करत आहेत. या सर्जरीसाठी त्यांना एक बॉडी डोनरही मिळाला आहे.
वांग हानमिंग यांच्यावर ही शस्त्रक्रिया होणार आहे. ते ६२ वर्षाचे आहेत. सहा वर्षांपूर्वी कुस्ती खेळत असताना त्यांना अर्धांगवायू झाला होता. तेव्हापासून त्यांचे मानेपासून खालचे संपूर्ण शरीर निष्क्रिय आहे. यात मृत्यूचा धोका आहे मात्र तरीही ते शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी तयार आहेत.
हार्बिन वैद्यकीय विद्यापीठातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. रेने या शस्त्रक्रियेची तयारी करत आहेत. शस्त्रक्रियेद्वारे पूर्ण शरीर प्रत्यारोपित केले जाईल. या शस्त्रक्रियेसाठी त्यांनी एक टीम तयार केली आहे. शस्त्रक्रिया केव्हा होईल हे अद्याप निश्चित झालेले नाही.
'द न्यूयॉर्क टाईम्स'च्या वृत्तानुसार हार्बिन येथीलच मूळ निवासी असलेले डॉ. रेने हे अमेरिकेत १६ वर्षे वैद्यकीय व्यवसाय करत होते. तिथे त्यांनी एका टीमसोबत १९९९ मध्ये हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केलेली. २०१२ मध्ये ते चीनला परतले आहेत.