वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेत असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भारताचं कौतुक केलंय.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलंय. भारताची गेल्या काही दिवसांतील प्रगती वाखाणण्याजोगी आहे, पण भारताबद्दल कोणी जास्त बोलताना दिसत नाही, असा त्यांचा सूर होता.
'भारत चांगले काम करत आहे. त्यांना चांगले यश मिळत आहे. मात्र, त्यांच्या चांगल्या कामगिरीविषयी कुणीही बोलत नाही. याआधी चीनविषयी सर्व जण बोलत होते. त्यांच्या कामगिरीची चर्चा सर्वत्र होत होती. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे, आता भारताने चांगली सुरूवात केली आहे' असं त्यांनी म्हटलंय.
यापूर्वीही भारतच पाकिस्तानवर नियंत्रण ठेवू शकतो, असे वक्तव्य त्यांनी केले होते.
डोनाल्ड ट्रम्प हे गेले काही दिवस त्यांच्या मुस्लिमविरोधी विधानांमुळे चर्चेत आहेत. चीन आणि मॅक्सिकोच्या नागरिकांचं अमेरिकेत स्थलांतरीत होण्यावर ते बऱ्याचदा बोलताना दिसतात. पण, त्यांनी भारताविषयी केलेल्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, त्यांच्या प्रचारादरम्यान ओबामांच्या काळात अमेरिकेचे जागतिक महासत्ता असणारे स्थान घसरल्याचीही टीकाही त्यांनी यावेळी केलीय.