बीजिंग : चीनची राजधानी बीजिंगमध्ये प्रदुषण वाढल्याने रेड अॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे गरज असल्यासच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन चीन सरकारने केले आहे. अशा वेळी मास्क किंवा एअर प्युरिफायर ऐवजी कंडोमची मागणी वाढल्याची आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.
धुरक्याच्या प्रभावामुळे १० डिसेंबरपर्यंत नागरिकांना जास्तीत जास्त वेळ घरातच राहण्याचा सल्ला चीन सरकारने दिल्यानंतर शॉपिंग वेबसाइटवर लोकं जास्त वेळ देत आहेत. ऑनलाइन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेली चीनमधील सर्वात मोठी वेबसाईट ताओबाओ डॉट कॉमने मागील आठवड्यात झालेल्या सर्च रेटिंगच्या आकडेवारीत कंडोमची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे म्हटले आहे.
विशेष म्हणजे हा आकडा धुर आणि धुके वाढल्यानंतर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्या पाठोपाठ स्पोर्टसवेअरला देखील मागणी असल्याचे आकडेवारीत स्पष्ट होते. वातावरणातील प्रदूषण कमी झाल्यावर लोक घराबाहेर पडून व्यायाम करतील असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.
चीन सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार रेड अॅलर्ट जारी केलेल्या भागांमध्ये २ कोटी २० लाख लोक राहतात. बीजिंग प्रशासनाने वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नावर तातडीची उपाययोजना म्हणून औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण करणारे अनेक कारखाने तत्काळ बंद केले आहेत. याशिवाय रस्त्यावर उतरवण्यात येणाऱ्या गाड्यांवरही बंदी घालण्यात आले आहे. तसेच दिल्लीमध्ये जसे वाहनांना सम आणि विषम क्रमांकांना एका दिवसाआड शहरात प्रवेश मिळण्याचा निर्णय झाला. तसाच निर्णय बीजिंग शहरात झाला आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांचे प्रमाण ५० टक्क्यांवर आणले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.