www.24taas.com, झी मीडिया, लाहोर
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि तहरिक ए इंसाफचे सर्वेसर्वा इमरान खान उंचावरून पडून गंभीर जखमी झाल्याची बातमी पसरली अन क्रिकेट जगतातही चिंतेचं वातावरण पसरलं. अनेकांनी त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी दुआँ केलीय.
मंगळवारी लाहोरमध्ये एका प्रचार सभेदरम्यान व्यासपीठावरून खाली पडून इमरान खान गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला खोल जखम झालीय. डॉक्टरांनी डोक्याला टाकेही घातलेत. त्यामुळेच इमरानसाठी सर्वसामान्यांसोबतच पाकिस्तानच्या खेळाडूही चिंता व्यक्त करत आहेत. पाकचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी, इंझमाम उल हक यांनी रुग्णालयात जाऊन इमरानच्या तब्येतीची विचारपूस केली. आफ्रिदीनं इमरानची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ‘मी लाहोरमध्येच होतो त्यामुळे इमरानची भेट घेता आली. ते आजही तितकेच विनम्र आहेत जितके अगोदर होते. मला खात्री हे की त्यांची तब्येतीत लवकरच सुधारणा होईल’ असं आफ्रिदीनं म्हटलंय. वसीम अक्रमनंही इमरानच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केलीय. ‘मला ही बातमी ऐकल्यानंतर धक्का बसला होता. लगेचच मी इमरानच्या संस्थेत फोन लावून त्याच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली. मला हे ऐकून खूप बरं वाटलं की त्याची प्रकृती स्थिर आहे’. माजी पाकिस्तानी कॅप्टन जावेद मियाँदाद यांनीदेखील इमरान खान यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी दुआ केलीय.
एक खेळाडू आणि राजकारणी असलेल्या इमरान खान जखमी झाल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया सोशल नेटवर्किंग साईटवर न उमटल्या तरच नवल! इमरानचे अनेक चाहते त्याला सोशल साईटवरून संदेश पाठवत आहेत. तसंच वेस्ट इंडिजचा खेळाडू ब्रायन लारानंही ट्विटरच्या माध्यमातून इमरानच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली.