www.24taas.com,नवी दिल्ली
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा दुस-या पर्वाची दुस-यांदा शपथ घेतील. ओबामांचा जाहीर शपथविधी सोहळा आज पार पडेल.
अमेरिकी घटनेनुसार २० जानेवारीला दुपारी १२ वाजता नव्या अध्यक्षाच्या कारकिर्दीला सुरुवात होते. मात्र रविवारी न्यायालय आणि इतर सार्वजनिक संस्था बंद राहत असल्याने या दिवशी अध्यक्षांचा जाहीर शपथविधी केला जात नाही. त्यामुळे ओबामांचा जाहीर शपथविधी सोहळा आज पार पडेल.
मात्र घटनेनुसार २० जानेवारीला शपथ घेणं बंधनकारक असल्याने काल व्हाईट हाऊसमध्ये एका छोटेखानी समारंभात ओबामांचा अधिकृत शपथविधी पार पडला. यावेळी ओबामांची पत्नी मिशेल ओबामा, दोन मुली आणि काही जवळची माणसं हजर होती. आज होणा-या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
२००९मध्ये ओबामांच्या शपथविधी सोहळ्यात २० लाख लोक सहभागी झाले होते. यावेळीही मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यापूर्वी अब्राहम लिंकन आणि मार्टिन लूथर किंग यांनी वापरलेलं बायबल यावेळी ओबामा शपथ ग्रहण करताना वापरणार आहेत.