www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
वॉशिंग्टनमध्ये प्रेयसीला मारहाण केल्याने भारतीय वंशाच्या सीईओची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. या सीईओने प्रेयसीला ११७ वेळेस लाथांनी मारहाण केलीय.
आपल्या प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेत प्रेयसीला अमानूष मारहाण केल्याचा आरोप या सीईओवर आहे.
अमेरिकेतील भारतीय वंशांचे उद्योजक गुरबक्ष चहल यांची रेडियम वन कंपनीच्या सीईओ पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. चहल हे वारंवार वादाच्या भोव-यात अडकत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत होती.
काही महिन्यांपूर्वी चहल यांनी प्रेयसीला अमानूष मारहाण केली होती. चहल यांच्या सीसीटीव्ही कॅमे-यात ही मारहाण कैद झाली होती. यात चहल यांनी प्रेयसीला तब्बल ११७ वेळा लाथा मारल्याचे दिसले होते. याप्रकरणामुळे चहल यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
मात्र अमेरिकेतील न्यायालयाने चहल यांना तुरुंगात न पाठवता तीन वर्ष प्रोबेशन, ५२ आठवडे घरगुती हिंसाचारविरोधी प्रशिक्षण शिबीर व २५ तास समाजसेवा करण्याचे आदेश दिले होते.
चहल यांचे किरकोळ शिक्षेवर भागले असले तरी त्यांना कंपनीच्या सीईओपदावरुन काढावे अशी मागणी अमेरिकेतील समाजसेवी संस्था करत होत्या. वाढत्या दबावापुढे नमते घेत कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली. या बैठकीत चहल यांची कंपनीतून हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
मूळचे पंजाबचे व सध्या अमेरिकेत स्थायिक झालेले ३१ वर्षीय गुरबक्ष चहल हे रेडियम वन या जाहिरात कंपनीच्या सीईओ पदावर कार्यरत होते. ही जाहिरात कंपनी इंटरनेट, मोबाईल व फेसबुकवर जाहिरातीचे काम बघते.
अवघ्या ३१ व्या वर्षी सीईओ पदापर्यंत पोहोचलेले चहल यांचा समावेश अमेरिकेतील मोस्ट एलिजेबल बॅचलर्सच्या यादीत होतो. मात्र चहल हे व्यवसायापेक्षा त्यांच्या अन्य `उद्योगां`मुऴे नेहमीच चर्चेत राहिले. त्यांच्यावर अमेरिकेत तब्बल ४५ गुन्हे दाखल आहेत.
चहल यांनी वयाची पंचवीशी गाठण्यापूर्वीच दोन जाहिरात कंपन्यांची स्थापना केली होती. या कंपन्या त्यांनी ३४० मिलीयन डॉलर्सला विकल्या होत्या. यानंतर ते रेडियम वनमध्ये रुजू झाले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.