www.24taas.com, झी मीडिया, रियाध
आपल्यालाही पुरुषांप्रमाणेच ड्रायव्हिंगचा हक्क मिळावा, यासाठी सौदी अरेबियाच्या महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. सौदी अरेबियात महिलांच्या ड्रायव्हिंगवर बंदी असल्यामुळे त्याविरोधात हे आंदोलन छेडण्यात आलं आहे.
पुरुषांप्रमाणे आपल्यालाही ड्रायव्हिंग करता यावं, दुकानात खरेदीसाठी जायचं असल्यास सहजपणे कारमधून जाता यावं, अशी महिलांची मागणी आहे. सौदी अरेबियात महिलांना कारने फिरायचे असल्यास त्यांना ड्रायव्हिंग करू दिले जात नाही. त्यांना मागच्या सीटवर बसून प्रवास करावा लागतो. याच नियमाला विरोध करण्यासाठी चार सौदी अरेबियनमहिलांनी रियाधच्या रस्त्यावरून ड्रायव्हिंग केलं. आणि त्यांना अडवण्यासाठी आलेल्या पोलिसांना चक्क चकवा देऊन त्या निघून गेल्या. महिलांच्या या ड्रायव्हिंगचा व्हिडिओही यूट्युबवर अपलोड करण्यात आला आहे.
मुख्य म्हणजे सौदी अरेबियात महिलांच्या ड्रायव्हिंगवर बंदी घालणारा कुठलाही कायदा कागदावर अस्तित्वात नाही. मात्र, काही कट्टर नेत्यांच्या प्रभावामुळे सौदी अरेबियात महिलांना ड्रायव्हिंग करू दिलं जात नाही असं म्हटलं जातं. सौदी अरेबियात राजेशाही अस्तित्वात असल्यामुळे देशाचे कायदे सौदी अरेबियाचे राजे ठरवतात.
PTI
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.