सुपरस्टारच्या 'आशिर्वाद'चा इतिहास!

दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांची शेवटची आठवण असलेला 'आशीर्वाद' बंगला अखेर विकायला काढलाय. कार्टर रोड परिसरातला हा बंगला सुमारे 90 कोटी रूपयांना विकत घेण्याची तयारी एका व्यावसायिकानं दाखवलीय... काकांचा हा आवडता बंगला... 

Updated: Jul 26, 2014, 02:16 PM IST
सुपरस्टारच्या 'आशिर्वाद'चा इतिहास! title=
हाच तो 'आशीर्वाद'

मुंबई : दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांची शेवटची आठवण असलेला 'आशीर्वाद' बंगला अखेर विकायला काढलाय. कार्टर रोड परिसरातला हा बंगला सुमारे 90 कोटी रूपयांना विकत घेण्याची तयारी एका व्यावसायिकानं दाखवलीय... काकांचा हा आवडता बंगला... 

ज्याने शेवटच्या दिवसांपर्यंत  साथ दिली... 
जो सुपरस्टारचा सगळ्यात फेव्हरेट होता...
जो सुख-दु:खात कायम सहभागी होता...
बॉलिवूडच्या पहिल्या सुपरस्टारची तो शान होता...
अर्थातच राजेश खन्ना यांचा 'आशीर्वाद' बंगला...
अखेर 90 कोटी रुपयांना तो विकला जातोय.... 

हा असा बंगला होता जो मुंबईच्या रस्त्यांचा लँडमार्क ठरला... हा असा बंगला होता ज्यात राहणारा माणूस लाखो चाहत्यांचा देव होता... हा बंगला म्हणजे त्यांच्यासाठी एक मंदिरच होतं...

बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांचा हा आशीर्वाद बंगला... मोठ्या कष्टाने राजेश खन्ना यांनी हा बंगला विकत घेतला होता. याआधी हा बंगला भारत भूषण यांच्या मालकीचा होता. त्यानंतर ज्युबली स्टार राजेंद्र कुमार यांनी विकत घेतला. तेव्हा या बंगल्याचं नाव होतं 'डिंपल'... हा बंगला राजेश खन्ना यांना प्रचंड आवडला. मात्र, त्यावेळी राजेंद्र कुमार यांना तो विकायचा नव्हता. मात्र, जेव्हा राजेंद्र कुमार यांनी तो बंगला विकला तेव्हा तो विकत घेण्यासाठी राजेश खन्ना यांच्याकडे 16 लाख रुपयेही नव्हते.

ही रक्कम गोळा करण्यासाठी त्यांनी बी आर चोप्रा यांच्याकडे अनेक फिल्म्स साईन केल्या. अखेर राजेश खन्ना यांनी हा बंगला विकत घेतला आणि या बंगल्याचं नाव ठेवलं 'आशीर्वाद'... जणू देवानेच त्यांना दिलेला हा आशीर्वाद होता. हा बंगला राजेश खन्नांना लकी ठरला कारण या अलिशान बंगल्यात राहायला गेल्यानंतर राजेश खन्ना यांच्या लागोपाठ 15 फिल्म्स हिट झाल्या. या बंगल्यानं सुपरस्टार राजेश खन्नांचं आनंदी जीवन अगदी जवळून पाहिलं... इतकंच नाही तर राजेश खन्नांचं दुःखही त्यानं अनुभवलं. 

18 जुलै 2012 ला राजेश खन्नांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यानंतर या बंगल्याच्या मालकी हक्कावरून वाद सुरु झाला. इतकंच नाही तर राजेश खन्नांच्या मृत्यूनंतर या बंगल्याचं नाव बदलून 'वरदान आशीर्वाद' असंही ठेवण्यात आलं. राजेश खन्नांनी हा बंगला आपल्या मुली ट्विंकल आणि रिंकी यांच्या नावावर केल्याचं त्यांच्या मृत्यूपत्रात नमूद केलंय. मात्र, शेवटच्या काळात काकाजींसोबत राहणारी त्यांची जवळची मैत्रीण अनिता अडवाणी यांनी या मृत्यूपत्रावरच आक्षेप घेतलाय.

आता तर हा बंगला खन्ना कुटुंबीयांनी विकायला काढलाय. मुंबईच्या कार्टर रोड परिसरात अगदी समुद्र किनारी असलेला 603 चौरस मीटरचा हा अलिशान बंगला... बाजारभावानुसार त्याची किंमत जवळपास 120 ते 130 कोटी रुपये असावी, असं बोललं जातंय. मात्र, शशी किरण शेट्टी नावाच्या एका व्यावसायिकाला तो केवळ 90 कोटी रूपयांना विकला जातोय. त्यामुळं अनिता अडवाणी यांनी बंगल्याच्या विक्रीला हरकत घेतलीय. याप्रकरणी त्या कोर्टात दादही मागणार आहेत.

आशीर्वाद बंगल्यामध्ये राजेश खन्नांचं म्युझियम व्हावं, अशी खुद्द काकाजींचीच अंतिम इच्छा होती, असा दावाही अडवाणी यांनी केलाय.

खरोखरच आशीर्वाद बंगल्यामध्ये राजेश खन्नांचं म्युझियम झालं असतं तर बॉलिवूडच्या या पहिल्या सुपरस्टारच्या स्मृती कायम जपल्या गेल्या असत्या. राजेश खन्नांच्या वस्तू, त्यांचे कपडे, ट्रॉफीज सारं काही चाहत्यांना जवळून पाहता आलं असतं. मात्र, कौटुंबिक कलहामुळे राजेश खन्नांची ही शेवटची आठवणही कायमची काळाच्या पडद्याआड जाणार आहे. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.