मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाची हवा सध्या महाराष्ट्रभर आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाने नवनवे विक्रम प्रस्थापित केलेत. सैराटची बॉक्स ऑफिसवर मोठी घोडदौड सुरु असताना इतर मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनावर मोठा परिणाम पाहायला मिळतोय.
सैराटच्या जबरदस्त लाटेमुळे अनेक मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्यात. २९ एप्रिल रोजी सैराट प्रेक्षकांच्या भेटीस आला. तेव्हापासून आतापर्यंत लोकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलंय.
सैराटला जबरदस्त मिळत असलेल्या प्रतिसादामुळे ६ मे रोजी त्यानंतर १३ मे रोजी एकही मराठी चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यांतर २० मेला पैसा पैसा झळकला खरा मात्र सैराटपुढे या चित्रपटाचे काही चालले नाही.
या आठवड्यात २७ मेला संजय लीला भन्साळी यांचा लाल इश्क हा सिनेमा प्रदर्शित होतोय. सैराटमय झालेले प्रेक्षक या सिनेमाला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.