मुंबई : विधानसभा निवडणूक 2014 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारी 3 वाजता संपलीय... जागावाटप, आघाडीचा आणि युतीचा घटस्फोट, इच्छुकांची नाराजी अशा सर्व पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत धावपळ दिसली.
विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपलीय. आघाडी, महायुती होणार की नाही? हा गोंधळ गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असल्यानं अखेरच्या क्षणी उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी चांगलीच धावपळ झाली. आघाडी तुटली, महायुती फुटली मात्र त्यानंतर सर्वच पक्षात नाराजांचं पेव फुटलं...
शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची नावं राजकीय पक्षांकडून निश्चित नव्हती. त्यामुळं अर्ज भरण्यासाठी धावाधाव, सावळा गोंधळ पाहायला मिळाला. कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरणार हे निश्चित नव्हते. काही उमेदवारांचं तिकीट अखेरच्या क्षणी कापून दुसऱ्याला उमेदवारी दिल्याचे प्रकारही घडले. त्यामुळं अखेरच्या क्षणापर्यंत गोंधळाच्या वातावरणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
पक्षांतराचा बाजार वधारला...
निवडणूक अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना पक्षांतराच्या बाजार वधारल्याचं चित्र दिसून आलं.
> राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरीचे आमदार उदय सामंत शिवसेनेतून उमेदवारी अर्ज दाखल केला.
> लातूमध्ये काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर हे राष्ट्रवादीच्या तंबूत दाखल झाले असून निलंग्यातून निवडणूक लढवणार आहेत.
> तसंच काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष राजेश्वर बुके औसा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार आहेत.
> चिंचवडचे अपक्ष आमदार लक्ष्मण जगताप हे भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
> मोर्शीचे अपक्ष आमदार अनिल बोंडे भाजपच्या तिकिटावर लढणार आहेत.
> तर अमरावतीचे काँग्रेसचे माजी मंत्री सुनील देशमुखही भाजपात दाखल झाले आहेत.
> नागपूर दक्षिणचे काँग्रेसचे आमदार दिनानाथ पडोळे हे राष्ट्रवादीत गेले आहेत.
> तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची बहिण उषा तनपुरे या राहुरी मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत.
> पुण्यातले काँग्रेसचे नेते दीपक मानकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला असून ते राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार आहेत.
> औरंगाबादमधील शिवसेनेचे किशनचंद तनवाणी हे भाजपच्या गोटात दाखल झाले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.