फलटण: गेल्या २५ वर्षांपासून अभेद्य असलेली युती तोडत भाजपनं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशिर्वादाचा विश्वासघात केल्याची बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. भाजपला १३४ जागा द्यायला शिवसेना नामर्द आहे का? असा सवाल विचारत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. फलटणमधील प्रचारसभेत ते बोलत होते.
महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीसमोर सोन्याचं ताट वाढून ठेवलं होतं, शिवछत्रपतींचाही आम्हाला आशिर्वाद होता मात्र भाजपनं युती तोडत ही सोन्यासारखी संधी गमावली असंही ते म्हणाले. संकटकाळात शिवसेना नेहमी भाजपच्या पाठीशी होती, मात्र चांगले दिवस आल्याचं दिसताच भाजपनं लगेच नातं तोडलं. महाराष्ट्राचे तुकडे पाडण्यासाठी भाजपनं युती तोडल्याचा आरोप उद्धव यांनी केला. शिवसेना संपवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ राज्यात प्रचारासाठी येणार आहे, असंही ते म्हणाले.
अजित पवारांनी शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केल्याचं सांगत त्यांनी आघाडी सरकारवरही हल्लाबोल केला. सही करता येतं हे दाखवण्यासाठीच पृथ्वीराज चव्हाण जाहिरातबाजी करत असल्याचा टोमणाही त्यांनी मारला. आघाडी सरकारमुळं शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू असून तेच अश्रू आपण पुसणार असल्याचं ते म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.