प्रचारतोफा थंडावल्या, आता ‘मतदारराजा’ची बारी

युती - आघाडीमधील 'घटस्फोट', पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झंझावाती सभा, बंडखोरी, 'लक्ष्मीदर्शन' यामुळं चर्चेत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपला. प्रचाराची मुदत संपेपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी चांगलीच धावपळ सुरु होती. 

Updated: Oct 13, 2014, 07:21 PM IST
प्रचारतोफा थंडावल्या, आता ‘मतदारराजा’ची बारी title=

मुंबई: युती - आघाडीमधील 'घटस्फोट', पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झंझावाती सभा, बंडखोरी, 'लक्ष्मीदर्शन' यामुळं चर्चेत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपला. प्रचाराची मुदत संपेपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी चांगलीच धावपळ सुरु होती. 

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी मतदान होणार असून आज संध्याकाळी सहापर्यंत प्रचाराची मुदत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कोकणमध्ये तीन सभा घेतल्या. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दक्षिण कराडमध्ये भव्य रोड शो काढून शक्तीप्रदर्शन केलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये सभा घेऊन प्रचाराचा समारोप केला.
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगावमध्ये प्रचार सभा घेतली. स्टार प्रचारकांच्या प्रचार सभा सुरु असतानाच उमेदवारांनी स्थानिक पातळीवर रोड शो, चौक सभा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. 

प्रचार आज संपला असून आता सर्वांचं लक्ष आता मतदानाकडे लागलंय. बुधवारी १५ ऑक्टोबरला राज्यातील ९० हजार ४३० मतदान केंद्रावर राज्यातील आठ कोटी १४ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.