नवी दिल्ली/ मुंबई : शिवसेना नेत्यांना भाजप नेते भेटलेच नाहीत असं आता पुढे आले आहे. आम्हाला कुणी भेटलीच नाही, अशी माहिती भाजपचे महाराष्ट्राचे निरीक्षक जे. पी. नड्डा यांनी दिलीय. दरम्यान, दिवाळीनंतर राजनाथ सिंह तसंच भाजपचे केंद्रीय नेते आणि मंत्र्यांशी शिवसेना चर्चा करणार असल्याचं सेना नेते दिवाकर रावते यांनी सांगितले.
भाजप नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेलेले शिवसेना नेते राजनाथ सिंग यांची भेट घेऊन सकाळी मुंबईला परतलेत. या भेटीची तपशिलवार माहिती दिल्लीहून परतलेले नेते सुभाष देसाई आणि अनिल देसाई आज उद्धव ठाकरेंना देतील. काहीही झालं तरी दिल्लीपुढे झुकणार नाही अशी भूमिका घेणा-या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घुमजाव करत अनिल आणि सुभाष देसाईंना दिल्ली दरबारी पाठवलं.
भाजपानं शिवसेनेशिवाय सरकार स्थापन करण्याची भूमिका घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अचानक भूमिका बदलल्याचं बोललं जातंय. शिवसेनेनं युतीसाठी भाजपापुढे प्रस्ताव ठेवल्याचं समजतंय. यावर भाजपा काय निर्णय घेणार, हे राज्याच्या भावी राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. दरम्यान, हा प्रस्ताव काय आहे याबाबत शिवसेनेनं मौन बाळगणंच पसंत केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.