मुंबई : ईशान्य मुंबईतल्या विक्रोळी मतदारसंघात भाजपचा खासदार, मनसेचा विद्यमान आमदार आणि सहा नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक शिवसेनेचे आहेत. विविध पक्षांचे प्रतिनिधी याठिकाणी निवडून आल्यानं आता विधानसभा निवडणुकीत काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
नाहूरपासून विक्रोळीपर्यंत विस्तारलेला विक्रोळी विधानसभा मतदारसंघ. नाहूर,भांडूप, कांजूर आणि विक्रोळी हा सर्व परिसर या मतदारसंघात येतो. याठिकाणी दलित मतदार अधिक असले तरी इतर समाजाचे मतदारही वास्तव्यास आहेत. याठिकाणी भाजप-रिपाईं युतीकडून रिपाईचे विवेक पंडित यांना उमेदवारी मिळालीय. तर शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत रिंगणात आहेत. मनसेकडून मावळते आमदार मंगेश सांगळे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात माजी खासदार संजय दिना पाटील यांनाही पक्षानं उमेदवारी दिलीय. या सगळ्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसनं नवा भीडू उभा केलाय. डॉ. संदेश म्हात्रे यांना काँग्रेसनं संधी दिलीय.
राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दिना पाटील यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. तर विद्यमान आमदार मंगेश सांगळे सध्या घरोघरी जावून मतदारांना आपण केलेल्या कामांची आठवण करुन देतायत. भविष्यातल्या विकास कामांबाबत त्यांनी एक न्यूजपेपरच छापलाय, जो ते प्रत्येक घरात वाटत आहेत.
आघाडी आणि युतीबाबत उशिरा निर्णय झाल्यानं त्याचा फटका उमेदवारांना बसतोय. कारण काँग्रेसचे उमेदवार डॉ. संदेश म्हात्रे यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाल्यानं त्यांना अजून प्रचारच सुरु करता आलेला नाही. इतकंच काय तर 15 वर्षानंतर याठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवत असल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांना जागं करावं लागतंय. दुसरीकडे रिपाईंचे उमेदवार विवेक पंडीत यांनाही अद्याप मोठ्या प्रचाराला सुरुवात करता आलेली नाही. सध्या ते आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांना घेवून दलित मतदारांना भेटण्याच्या गडबडीत आहेत.
गेल्या विधानसभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विक्रोळीतली सभा गाजली होती. त्याचाच परिणाम म्हणून मनसेचा आमदार निवडून आला. नुकत्याच झालेल्या लोकसभेत मोदींच्या लाटेत इथं भाजपचे किरीट सोमय्या खासदार झाले. याच प्रभागात शिवसेनेचे तीन नगरसेवक, राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक तर मनसेचा एक नगरसेवक आहे. तसंच एनसीपीने आपल्या माजी खासदाराला रिंगणात उतरवलं आहे. डंपिंग ग्राउंडचा वाद, ट्रांजिट कॅम्पमधील रहिवाश्यांचं पुनर्वसन, आरोग्य आणि शिक्षण याबाबतचा विकास इथल्या मतदारांना हवा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.