नागपूर : जिल्ह्यातील सुमारे 500 निवासी डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आली आहे. कारवाई करण्यासंबंधी ही नोटीस बजावली आहे. डॉक्टर मारहाण प्रकरणानंतर डॉक्टरांनी सामूहीक रजेचे हत्यार उपसले आहे. आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे.
काल आंदोलन मागे घेण्याबाबत सांगताना न्यायालयाने चांगलेच फटकारले होते. जमत नसेल तर काम सोडून घरी बसा, असे खडसावले होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांना नोटीस देण्यात आली आहे. ही नोटीस महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, मुंबईतही निवासी डॉक्टरांना प्रशासनाकडून तंबी देण्यात येत आहे. कामावर रुजू व्हा नाही तर कारवाई केली जाईल, असे सायन हॉस्पिटलचे डीन सुलेमान मर्चंट यांनी निवासी डॉक्टरांना नोटीशीद्वारे बजावले आहे.
तसेच एमडी, एमएसचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची नोंदणी रद्द होण्याचे संकेत मिळत आहेत. वैद्यकीय शिक्षण संचालनालय आरोग्य विद्यापीठाला याबाबत सूचना करणार आहे.
आजच्या बैठकीत निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला नाही तर विद्यार्थी असल्याची नोंदणी रद्द होणार आहे. डिएमईआरचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी ही माहिती दिली.