पुणे : सत्ता गेली, उपमुख्यमंत्री पद गेलं, लाल दिवा गेला... पण अजित पवारांचा पीळ अजून गेलेला नाही. पुणे जिल्हा परिषद, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा सपाटा अजित पवारांनी सध्या लावलाय. आघाडी सरकारनं २०११ मध्ये काढलेल्या आदेशाला ते स्वतःच हरताळ फासतायत...
वरील फोटोतअजित पवारांच्या शेजारी बसलेत ते कुणाल कुमार... पुणे महापालिकेचे आयुक्त. कुणाल कुमार यांच्या मागे दोन अतिरिक्त आयुक्त बसले आहेत, राजेंद्र जगताप आणि ओमप्रकाश बकोरीया... अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला हे सगळे उपस्थित आहेत... खरं तर आमदारांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊ नयेत आणि घेतल्याच तरी सरकारी अधिका-यांनी अशा बैठकांना उपस्थित राहू नये, असा स्पष्ट आदेश काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारनं काढला होता... १० मे २०११ रोजी काढलेला हाच तो आदेश.... तत्कालिन मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या सहीने हा आदेश काढण्यात आलाय. या आदेशाच्या पाच प्रती उपमुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात आल्यात... म्हणजेच अजित पवारांना हा आदेश चांगलाच माहिती असणार... तरीही अजित पवार यांनी स्वतःच्याच सरकारने काढलेला आदेश धुडकावून, बैठकांचा सपाटा लावला आहे. या बैठकांना उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना याविषयी विचारले असता, त्यांनी मात्र कातडीबचाव भूमिका घेतलीय… महापौरांनी बोलावल्यानं आपण त्या बैठकीला गेलो, असं त्यांनी म्हटलंय.
विरोधकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यापासून रोखणारे अजित पवार आता स्वतःच विरोधी बाकांवर आहेत.. त्यावेळी विरोधकांची कोंडी करण्यासाठी आघाडी सरकारने हा आदेश काढला खरा… मात्र, सत्ता गमावल्यानंतर आता तोच आदेश त्यांच्यासाठी अडचणीचा ठरतोय...
स्वतःच्याच सरकारने काढलेले आदेश, अजित पवार यांना आता अडचणीचे ठरणार असं दिसतंय... अजित पवारांचे विरोधक म्हणजेच, आताच्या सत्ताधाऱ्यांनी तर या प्रकाराला विरोध केला आहेच. मात्र, अजित पवार स्वतःच्याच सरकारच्या आदेश भंग करणाऱ्या बैठका घेणं बंद करणार का की अधिकारी अशा बैठकांना विविध कारणं देत उपस्थित राहायचं टळणार. हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.