www.24taas.com, मुंबई
एमपीएससी परीक्षेवर अभूतपूर्व संकट ओढवलय. एमपीएससीचा सर्व डेटा करप्ट झालाय. एमपीएससीचा सर्व्हरच क्रॅश झालाय. यामुळं विद्यार्थ्यांना पुन्हा फॉर्म भरावे लागणार आहेत. येत्या रविवारी ही परीक्षा होणार आहे. दोन दिवसांत सर्वांना पुन्हा फॉर्म भरणं अशक्य आहे. त्यामुळं परीक्षार्थींपुढे प्रश्न निर्माण झाला आहे.
हे फॉर्म भरण्यासाठी दोन दिवसांचीच मुदत देण्यात आली आहे. मात्र सुमारे साडे तीन लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्यासाठी एमपीएससीच्या वेबसाईटवर भेट दिल्याने ही वेबसाईट क्रॅश होत आहे, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.
येत्या सात तारखेला राज्यसेवेची पूर्व परीक्षा आहे. 4 तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना पुन्हा माहिती अपलोड करावी लागणार आहे.
या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी खूपच गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्यातच आता डेटा करप्टसारखा पेच निर्माण झाल्याने, परीक्षार्थी हवालदिल झाले आहेत. परीक्षार्थींनी फॉर्म भरण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे. तसेच मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थींनी केली आहे.
विद्यार्थी परीक्षेच्या अभ्यासात व्यस्त असताना अशा प्रकारने मानसिक छळ केला जात आहे. या सर्वात जास्त त्रास हा ग्रामीण विद्यार्थ्यांना होणार आहे. ही परीक्षा पुढे ढकलणं ही खूप अडचणीचं ठरणार आहे. विविध स्पर्धा परीक्षेंच्या तारखा या बऱ्याच आधी निश्चित होतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाची २६ मे रोजी जाहीर झाली आहे, तसेच विविध बँकांच्या स्पर्धा आहे, त्यामुळे हे खूप जिकरीचे होणार असल्याचे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश यांनी सांगितले.