औरंगाबादच्या कन्यानेचा पराक्रम, किलीमंजरो शिखर केले पार

जिद्द आणि आवड असेल तर माणूस किती उंची गाठू शकतो, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गिर्यारोहक मनिषा वाघमारे. औरंगाबादच्या या शिखर कन्येनं आफ्रिका खंडातील सर्वात उंच किलीमंजरो हे शिखर पार करण्याचा पराक्रम गाजवलाय.

Updated: Nov 25, 2015, 09:12 PM IST
औरंगाबादच्या कन्यानेचा पराक्रम, किलीमंजरो शिखर केले पार title=

औरंगाबाद : जिद्द आणि आवड असेल तर माणूस किती उंची गाठू शकतो, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गिर्यारोहक मनिषा वाघमारे. औरंगाबादच्या या शिखर कन्येनं आफ्रिका खंडातील सर्वात उंच किलीमंजरो हे शिखर पार करण्याचा पराक्रम गाजवलाय.

मनिषा वाघमारे. बालपणापासूनच तिला मोहीनी घालतात ती उंचच उंच गिरीशिखरं. जगभर फिरून ही शिखरं काबीज करण्याची तिची मनिषा. तेच स्वप्न पूर्ण करण्याच्या मोहिमेवर सध्या ही शिखर कन्या निघालीय. मनिषानं याआधीच भारत आणि आसपासच्या देशातली २१ पेक्षा जास्त गिरीशिखरं सर केलीत. 

आता तिला वेध लागलेत ते मिशन गो फॉर ७ समिटचे. हे आहे जगातली सर्वात उंच सात शिखरं सर करण्याचं मिशन. यापैकी ऑस्ट्रेलियातलं माऊंट कोजिएस्कोव आणि युरोपमधील माऊंट एलब्रुज शिखर तिनं गाठले. त्यापाठोपाठ अलिकडेच आफ्रिका खंडातील किलीमंजीरो हे १९  हजार ३९५ फुटाचं शिखरही तिनं सर केलं.

किलीमंजीरो शिखर करताना तर नशिबानंच तिची परीक्षा घेतली. त्या चढाई पथकात तिच्यासह चिलीचे सहा जण आणि तुर्कीचा एक जण असा आठजणांचा गट होता. ही मोहिम होती १२ दिवसांची.  मात्र अचानक वातावरण बदलल्यानं ही मोहीम रद्द करणं किंवा ती ६ दिवसांत फत्ते करणं असे दोनच पर्याय मनिषा आणि टीमपुढं होते. मनिषाच्या टीमनं दुसरा पर्याय निवडला. अवघ्या सहा दिवसांत किलीमंजीरो शिखरावर तिरंगा फडकला... तिला आता उरलेली चार शिखरं सर करायची आहेत.

या मोहीमेत मनिषाला भरभक्कम पाठिंबा दिला तो तिच्या कुटुंबानं. मनिषाने भारताचा तिरंगा सातासमुद्रापार हजारो फुट उंचीवर फडकवल्यामुळे कुटुंबियांचा आनंद जणू गगनाला भिडलाय. जगातली उंच गिरीशिखरं काबीज करण्याच्या या मोहिमांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी मनिषा वाघमारे ही एकमेव महिला आहे. झी मीडियाच्या तिला खास शुभेच्छा.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.