प्रभाग रचनेवरून भाजप-राष्ट्रवादीत जुंपली

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी ७ ऑक्टोबर रोजी प्रभाग रचना जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच प्रभाग रचनेवरून शहरात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. 

Updated: Oct 1, 2016, 08:09 PM IST
प्रभाग रचनेवरून भाजप-राष्ट्रवादीत जुंपली title=

कैलास पुरी, पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी ७ ऑक्टोबर रोजी प्रभाग रचना जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच प्रभाग रचनेवरून शहरात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. 

महापालिका निवडणुका जशा जवळ येऊ लागल्यात तसा पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष विकोपाला जाऊ लागलाय. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यानंतर आता या दोन्ही पक्षात प्रभाग रचनेवरून जुंपलीय. भाजपचे राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केलीय. अजित पवार यांच्या सांगण्यावरून महापालिका अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला फायद्याची होईल, अशी प्रभाग रचना केल्याचा आरोप खासदार अमर साबळे यांनी केलाय. 

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनंही भाजपववर हल्ला चढवालाय. भाजपनंच प्रभाग रचनेत बदल केल्याचा आरोप करत सात तारखेला प्रभाग रचना जाहिर झाल्यानंतरच कोणी हस्तक्षेप केला हे स्पष्ट होईल, असा पलटवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केलाय. 

प्रभाग रचना आपल्याला अनुकूल व्हावी यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवलेत. मात्र, प्रभाग रचना जाहीर होण्यापूर्वीच ती बदलल्याचे आरोप-प्रत्यारोप सुरु झाल्यामुळे साऱ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहचलीय. मात्र खरं चित्र ७ तारखेलाच स्पष्ट होईल.