महाराष्ट्र सुन्न : मुख्यमंत्र्यांच्या मदतीनंतरही शेतकरी महिलेची आत्महत्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतलेल्या एका शेतकरी महिलेनंही आत्महत्या केल्यानं खळबळ उडालीय.

Updated: Jun 12, 2015, 08:39 PM IST
महाराष्ट्र सुन्न : मुख्यमंत्र्यांच्या मदतीनंतरही शेतकरी महिलेची आत्महत्या title=

यवतमाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतलेल्या एका शेतकरी महिलेनंही आत्महत्या केल्यानं खळबळ उडालीय.

खरं तर मुख्यमंत्र्यांनी यवतमाळमधल्या पिंपरी बुटी गावातल्या शेतकरी कुटुंबातील शांता ताजणे यांना मदतीचं आश्वासन दिलं होतं. त्याप्रमाणं बँकेत एक लाखाची मदत जमाही झाली. मात्र, त्यातले ७० हजार रुपये वापरण्यासाठी बँकेतून काढावे कसे? याबद्दल कुणीही नीट माहिती दिली नाही. अशा परिस्थितीत पेरणीसाठी पैसे आणायचे कुठून ह्या विवंचनेत शांताबाई होत्या. आणि त्याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली. 

मुख्यमंत्र्यांकडून मदत मिळूनही आत्महत्या होत असल्यामुळे जिल्हा आत्महत्यामुक्त करायचा कसा, असा प्रश्न स्थानिक प्रशासनाला पडलाय. 

यासंदर्भातलं वृत्त समजताच मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत. या शेतकरी महिलेनं आत्महत्या का केली आणि जाहीर झालेली मदत संबंधित महिलेला मिळाली का आणि नसेल तर त्या मागची कारणे तपासण्याचं आदेश दिल्याचं फडणवीस म्हणालेत.

उल्लेखनीय म्हणजे, जानेवारीपासून आत्तापर्यंत महाराष्ट्रात १०८८ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून मृत्यूला कवटाळलंय. 

आत्महत्या थांबाव्यात यासाठी सरकारकडून प्रयत्नही होतायत. मात्र शांता ताजणे यांच्या मृत्यूवरून केवळ मदतच पुरेशी नसल्याचं दिसून येतंय. आत्महत्याग्रस्त भागात आज खरी गरज आहे ती जगण्याचं बळ देण्याची. ते बळ मिळालं तरच अवकाळी आणि दुष्काळ या शब्दांची तीव्रता कमी होईल... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.