कॉम्रेड गोविंद पानसरे शोषितांसाठी लढणारा पुरोगामी नेता

कॉम्रेड गोविंद पानसरे म्हणजे शोषितांसाठी लढणारा पुरोगामी नेता आणि कुशल संघटक..महाराष्ट्रातील कष्टकरी आणि उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून देणारा संघर्षशिल नेता म्हणजे गोविंद पानसरे. गोविंद पंढरीनाथ पानसरे म्हणजे आहे एका संघर्षाचं नाव.

Updated: Feb 21, 2015, 08:55 AM IST
कॉम्रेड गोविंद पानसरे शोषितांसाठी लढणारा पुरोगामी नेता title=

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे म्हणजे शोषितांसाठी लढणारा पुरोगामी नेता आणि कुशल संघटक..महाराष्ट्रातील कष्टकरी आणि उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून देणारा संघर्षशिल नेता म्हणजे गोविंद पानसरे. गोविंद पंढरीनाथ पानसरे म्हणजे आहे एका संघर्षाचं नाव.

समाजाला नवी दिशा देणारे विचारवंत, पुरोगामी चळवळीचे कुशल संघटक, अन्यायाविरुद्ध लढणारे लढाऊ नेते, नवा विचार देणारे लेखक-संशोधक-वक्ते आणि अनेकांचे आधारवड म्हणजे काँम्रेड गोविंद पानसरे. छत्रपती शाहूंचा वारसा पुढे चालवण्याचं काम पानसरेंनी कोल्हापूरातून केलं. पण पानसरे मुळचे अहमदनगर जिल्हातील श्रीरामपूर तालुक्यातील कोल्हार गावचे. २६  नोव्हेंबर १९३३ ला एका गरिब शेतकरी कुटुंबात पानसरे जन्मले. शिक्षणासाठी वयाच्या पंधराव्या वर्षी पानसरेंनी कोल्हापूर गाठलं. तेव्हापासून कोल्हापूर आणि पानसरे असं जणू समिकरणचं झालं. 

पानसरेंचे कोल्हापूरातील सुरवातीचे दिवस संघर्षाचे होते. रहायला निवारा नाही ना खायला अन्न अशी सुरवातीला पानसरेंची अवस्था होती. त्याही स्थितीत संघर्ष करत पानसरेंनी पुढे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये प्रवेश मिळवला नंतर राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. नोकरी करत कायद्याचं शिक्षण घेऊन पुढे ते नामवंत वकील झाले. पण या प्रवासात त्यांनी कधी जकात नाक्यावर शिपाई म्हणून नोकरी केली तर कधी रस्त्यावर कंगवे आणि वृत्तपत्रेही विकली. कधी कुणाच्या घरी स्वयंपाकाला मदतही केली तर कधी पुस्तकाच्या दुकानात काम केलं..पण आपला स्वाभिमान कधी गमावला नाही.. 

शोषितांसाठी लढणा-या पानसरेंवर कम्यूनिस्ट विचारसरणीचा  सुरवातीपासून प्रभाव होता. १९५२ मध्येच ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद बनले. त्या माध्यमातून त्यांनी आय़ुष्यभर वंचितांसाठी संघर्ष केला. पायाला भिंगरी लावून पानसरेंनी सगळा महाराष्ट्र पिंजून काढला. हजारो व्याख्यानं, कार्यशाळा, व्यक्तिगत संपर्क यांच्या माध्यमातून पानसरेंनी आपलं कार्य नेटानं  पुढं नेलं. आर्थिक विषमता, शोषण, सामाजिक अन्याय आणि अंधश्रद्धा याविरोधात त्यांनी कायम आवाज उठवला. अशा कितीतरी आंदोलनात पानसरेंनी झोकून दिलं. संघर्ष आणि लढे  हेच त्याचं जीवन होतं.

 
 पानसरे यांचा संघर्ष 

- संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग

- महागाई आणि उपासमारीविरोधात आंदोलन

- आरक्षणासाठी लढा

- काळम्मावाडी धरणग्रस्त आंदोलन

- वर्णव्यवस्थेच्या विरोधात शंकराचार्यांशी संघर्ष

- पावसासाठी प्रार्थना करणा-या राज्यपालांचा निषेध

- कोडोलीच्या नग्न पुजेविरोधात आंदोलन

- दारुबंदीसाठी आंदोलने

- अंधश्रद्धा आणि बुवाबाजीविरोधात लढे

- जातीव्यवस्थेविरुद्ध लढे

- पर्यावरण रक्षणासाठी लढे

- टोलविरोधात आंदोलन

कृतीशिल विचारवंत कसा असावा याचा आदर्शच?
 
काँग्रेड गोविंद पानसरे म्हणजे कृतीशिल विचारवंत कसा असावा याचा आदर्शच. आयुष्य़भर त्यांनी असे शोषित आणि नाहीरे वर्गासाठी लढे दिले.श्रमिक प्रतिष्ठानची स्थापना करुन पानसरेंनी पुरोगामी, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींसाठी कोल्हापूरात व्यासपिठ निर्माण करुन दिलं. सामाजिक सलोखा राखण्यासाठी पानसरेंनी सतत प्रयत्न केले. १९९२ साली बाबरी मस्जिद कोसळल्यानंतर सगळा देश दंगलीच्या वणव्यात होरपळत असतांनाही  पानसरेंच्या प्रयत्नांमुळेच कोल्हापूर शांत राहिलं. पानसरेंच्या 'आम्ही भारतीय लोक आंदोलना'नं यात मोठी भूमिका बजावली. 

समाजप्रबोधनासाठी वाणी बरोबरच लेखणीही प्रभावीपणे वापरली पाहिजे हे पानसरेंनी आपल्या ग्रंथांव्दारे दाखवून दिलं.

पानसरे यांची ग्रंथसंपदा

- शिवाजी कोण होता ?

- राजर्षी शाहू - वसा आणि वारसा

- धर्म , जात, वर्ग आणि परिवर्तनाची दिशा

- शेतकरी  Vsउद्योग व्यापारशर्ती

- गोविंद पानसरे समग्र साहित्य  

अशा पुस्तकांमधून गोविंद पानसरे यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलं. बोले तैसा चाले हा त्यांचा बाणा होता. जसे विचार त्यांनी मांडले तसेच पानसरे वागलेही. 

धीरोदत्तपणा आणि विचारांशी प्रामाणिकपणा हे पानसरेंच्या विचाराचं वैशिष्ठ. पानसरेंचा एकूलता एक पुत्र काँग्रेड अविनाशचं तरुणपणीच निधन झालं. हे दु:खही पानसरे दाम्पत्यानं धिरोदत्तपणे पचवलं आणि आपलं समाजसेवेचं काम न डगमगता सुरुच ठेवलं. समाजासाठी आयुष्य झोकून दिलेला नेता म्हणजे काँम्रेड गोविंद पंढरीनाथ पानसरे.. 

सच्चा सामाजिक नेता आणि  धडाडीचा सामाजिक कार्यकर्ता कसा असावा याचा आदर्श म्हणजे काँग्रेड गोविंद पंढरीनाथ पानसरे. प्रतिगामी विचार समाजात डोकं वर काढत असतांना काँम्रेड गोविंद पानसरेंनी उभ्या केलेल्या लढयात कृतीशिलपणे सामिल होणं अधिकज गरजेचं झालं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.