नवी दिल्ली : वर्ध्याजवळच्या पुलगावमधल्या केंद्रीय दारुगोळा भांडारात लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत २० जणांचा बळी गेलाय. लष्कर प्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग वर्ध्याला रवाना झाले आहे. शिवाय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरही वर्ध्याच्या दिशेनं रवाना झालेत.
पुलगाव दुर्घटनेत लेफ्टनंट जनरल रणवीर सिंग आणि मेजर के मनोज या लष्करी अधिकाऱ्यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. रात्री दोनच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीनंतर आता आजूबाजूच्या परिसरातली १५ गावं रिकामी करण्यात आली आहेत.
आगीमध्ये दारूगोळा डेपोतल्या स्फोटामध्ये अनेक जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचंही पुढे येतंय. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर पुलगाव जाणार असल्याचं सूत्रांनी म्हटलंय. शिवाय या प्रकरणाचा अहवालही मागवण्यात आलाय.