मुंबई : नाशिक आणि धुळे जिल्ह्यात सलग दुस-या दिवशी गारपीटीमुळं पीकांचं मोठं नुकसान झाले आहे. कोकण आणि पुण्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भ वगळता राज्यात येत्या ४८ तासांत पावसाची शक्यता कुलाबा वेध शाळेने व्यक्त केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे महाराष्ट्राला जोरदार तडाखा बसलाय. अवकाळी पावसामुळे पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शिवाय पावसामुळे पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवही रद्द करावा लागलाय.
दरम्यान, येत्या 48 तासात पुन्हा पाऊस कोसळल्याची शक्यता आहे. विदर्भ वगळता महाराष्ट्राच्या अन्य भागात पाऊस पडेल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय. मुंबईतही पुढचे दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण कायम राहणार आहे.
कोकणातही अवकाळी पावसानं हापूस आंबा पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झालीय. पावसामुळे हापूस आंब्याला आलेला मोहोर गळून पडलाय. त्यामुळे आंबा बागायतदार धास्तावलेत. तर नाशिक भागात गारपीट आणि अवकाळी पावसामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
तसंच अनेक पशू-पक्षीही दगावलेत. गहू, हरभरा, द्राक्षं यासह काढणीला आलेला लाल कांदा आणि बाळसे धरू लागलेला रांगडा कांदा अशा सर्वच पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्याशिवाय बदलत्या वातावरणामुळं आजारही वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.