पुणे : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षात जोरदार इनकमिंग आऊटगोईंग सुरू झालंय. सध्या तरी भाजपकडे आयारामांचा सर्वाधिक ओढा असल्याचं चित्रं आहे. तर गळती रोखण्याची चिंता इतर पक्षांना लागलीय.
महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. नगरसेवक इच्छूक उमेदवार यांचं पक्षांतर सुरू झालंय. पुणे महापालिकेतील जवळपास अर्धा डझन नगरसेवकांनी आत्तापर्यंत भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्याशिवाय इतर पक्षातील पदाधिकारी, माजी नगरसेवक, राजकीय नेत्यांची मुलं यांनीही भाजपचा रस्ता धरलाय. भाजपने फक्त अजूनपर्यंत सहकारी पक्ष शिवसेनेला हात लावलेला नाही. त्याव्यतिरिक्त राष्ट्रवादी, मनसे आणि काँग्रेसमधील कोणी ना कोणी भाजपमध्ये प्रवेश केलाय. पक्षप्रवेशासाठी इच्छुकांची रांग मोठी असली तरी विचार करूनच प्रवेश दिला जाणार आहे असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे.
पक्षाला लागलेली गळती कशी रोखायची हा प्रश्न प्रत्येक पक्षासमोर आहे. महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीलाही धास्ती आहे. राष्ट्रवादीच्या एका विद्यमान नगरसेवकाने भाजपचा रस्ता धरलाय. तसंच राष्ट्रवादीतील इतरही काही जण भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. पक्षाला याची कल्पना आहे. पण फोडाफोडीच्या राजकारणात राष्ट्रवादीही उतरणार असल्याचं स्पष्ट आहे.
महापालिकेतील सत्ता आणि अजित पवार यांचं नेतृत्व यामुळे राष्ट्रवादीची स्थिती काहीशी बरी आहे. मात्र काँग्रेस, शिवसेना, मनसेची स्थिती अवघड झालीय. काँग्रेस, शिवसेना यांच्याकडे नेतृत्वाचा अभाव आहे. पण किमान त्यांची संघटना तरी आहे. मनसेची मात्र स्थिती बिकट झालीय. आता निवडणुका जवळ येतील तसं तसं कोणाला किती खिंडार पडणार हे लवकरच स्पष्ट होईल.
पाहा व्हिडिओ