राष्ट्रवादीची सूत्र 'ताईं'कडे देण्याच्या चर्चांवर 'दादा' म्हणतात...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक झाल्या आहेत. सुप्रिया सुळेंच्या अचानक आक्रमक होण्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Updated: Oct 9, 2016, 08:52 AM IST
राष्ट्रवादीची सूत्र 'ताईं'कडे देण्याच्या चर्चांवर 'दादा' म्हणतात... title=

पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक झाल्या आहेत. सुप्रिया सुळेंच्या अचानक आक्रमक होण्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे अजितदादांना धक्का देऊन राष्ट्रवादीची सूत्र सुप्रिया सुळेंकडे देणार म्हणून त्या आक्रमक झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. सुप्रिया सुळेंना राष्ट्रवादीचं नेतृत्तव घ्यायचं आहे, म्हणून त्या मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

या सगळ्या चर्चांवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे, आम्ही पाहून घेऊ असं सांगतानाच भाजपने राज्यात जी अस्वस्थता आहे ती मिटवण्याचा प्रयत्न करावा असा सल्लाही अजितदादांनी भाजपला दिला आहे.

मुख्यमंत्र्यांवरही टीका

विरोधकांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवरही अजित पवारांनी टीका केली आहे. आपण एक पक्षाचे नाही तर राज्याचे मुख्यमंत्री आहात, आपल्या तोंडून अशी भाषा शोभत नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.यशवंतराव चव्हाण यांच्या पासून अनेक मुख्यमंत्री झाले पण या पूर्वी असं कोणी बोललं नव्हतं असं सांगत पवारांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली.

भगवान गड वादावरही दादा बोलले

भगवान गडाच्या निमित्ताने निर्मण झालेला वाद आणि पंकजा मुंडे यांनी दिलेली धमकी यावर बोलतानाही त्यांनी मुंडे आणि सरकारवर जोरदार टीका केली. सरकारमधला मंत्रीच धमकी देत असेल तर ते चुकीचे असल्याचं सांगत राज्याची जनता असले प्रकार खपवून घेणार नाही असंही ते म्हणाले.

पदाचा वापर मंत्री कश्यासाठी करतात हे ही यातून समोर आल्याचं ते म्हणाले. विरोधक म्हणून आम्ही पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचं सांगतानाच मुख्यमंत्री मात्र या मागणीवर थातुर मातुर उत्तर देऊन कायम वेळ काढण्याची भूमिका घेतात अशी टीकाही त्यांनी केली.