अश्विनी पवार, पुणे : कोल्हापूरचं नाव घेतलं की तिथले पदार्थ डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाहीत. याच कोल्हापुरी पदार्थांचा आस्वाद पुण्यातल्या खवय्यांना घेता यावा याकरता, पुण्यात खास कोल्हापूर खाद्य महोत्सवांच आयोजन करण्यात आलंय.
कोल्हापूर म्हणजे चमचमीत, झणझणीत खाद्य पदार्थांची रेलचेल असलेली नगरी... हौसेनं खाद्यपदार्थांवर केले जाणारे नवनवीन प्रयोग आणि तरीही दुसऱ्या बाजूला आपल्या पारंपरिक चवीशी बांधलेली घट्ट नाळ हे कोल्हापुरी खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्यच... असे सगळे अस्सल कोल्हापुरी पदार्थ, पुणेकरांना कोल्हापूर फूड फेस्टिवलच्या माध्यमातून अनुभवता येत आहेत.
कोल्हापुरच्या तांबड्या पांढऱ्या रश्श्यापासून ते मिसळपर्यंत आणि बर्फाच्या गोळ्या पासून कोल्हापूरी काकवीपर्यंत सगळं काही, पुणेकरी शौकीन खवय्यांना या फेस्टिवलमध्ये एका छताखाली चाखता येतंय. कोल्हापूर इटरीजतर्फे पहिल्यांदाच अशा प्रकारच्या फेस्टिवलचं आयोजन केलं जातंय आणि त्याला पुणेकरांचाही भरभरुन प्रतिसाद मिळतोय.
कोल्हापूरमधली अनेक सुप्रसिद्ध हॉटेलांनी या महोत्सवात सहभाग घेतलाय. पुणेकरांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे आता पुण्यातही आपली शाखा सुरु करण्याचा विचार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
प्रत्येक भागाची स्वतःची अशी एक खाद्यसंस्कृती असते. त्या खाद्यसंस्कृतीचा प्रचार आणि प्रसार होणं महत्त्वाचं असतं. या खाद्य महोत्सवामुळे, त्यालाचा हातभार लावला गेलाय.