रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरील महाडजवळील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल वाहून गेल्याने झालेल्या दुर्घटनेत २२ पेक्षा जास्त लोक गायब असल्याचे वृत्त आहे. याच नदीत एसटी महामंडळाच्या दोन बसेस आणि सात खासगी वाहनं वाहून गेली आहेत.
जेव्हा पूल तुटला तेव्हा मुंबई गुहागर ही बस घेऊन ड्रायव्हर सुरेश जाधव आणि कंडक्टर संजय केदार जात होते. ही गाडी पुलाच्या काही दूर अंतरावर असताना एका व्यक्तीने माहिती दिली आणि ते सावध झाले.
पुलाजवळ येताच त्यांनी हेडलाईटच्या प्रकाशात अवस्था पाहिली आणि एसटी मागे वळवली. आणि एसटी पुन्हा मार्गस्थ होताना त्यांनी या सर्वांची माहिती वाटेतील वाहनचालकांना दिली. आणि नंतर होणा-या सगळ्या दुर्दैवी घटनांपासून सर्वांना सावध केले.
महाडच्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी राज्य सरकारनं मान्य केलीय. विधानसभेत विरोधकांच्या आक्षेपांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलीय. शिवाय पंधरा दिवसात प्राथमिक स्ट्रकचरल ऑडिट पूर्ण करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलयं. अनेक ब्रिटीश कालीन पूल आपल्या राज्यात आहे. त्यामुळे त्याला राजकीय रंग देण्याची गरज नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.