नाशकातील मनसे-भाजप युती संपुष्टात, उद्धव खूश

 नाशिक महापालिकेतली मनसे-भाजपचा अडीच वर्षांचा संसार अखेर संपुष्टात आलाय. शिवसेनेचा महापौर निवडून आणण्यासाठी भाजपनं पुन्हा शिवसेनेसोबत घरोबा करायचं ठरवलंय. त्यामुळं महापौर निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंच्या मनसेची मोठी कोंडी झालीय. इतके दिवस नाशिककर संभ्रमात होते, पण आता त्यांनाही चांगलं प्रशासन मिळणार आहे, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केलाय. 

Updated: Sep 10, 2014, 08:36 AM IST
नाशकातील मनसे-भाजप युती संपुष्टात, उद्धव खूश title=

नाशिक : नाशिक महापालिकेतली मनसे-भाजपचा अडीच वर्षांचा संसार अखेर संपुष्टात आलाय. शिवसेनेचा महापौर निवडून आणण्यासाठी भाजपनं पुन्हा शिवसेनेसोबत घरोबा करायचं ठरवलंय. त्यामुळं महापौर निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंच्या मनसेची मोठी कोंडी झालीय. इतके दिवस नाशिककर संभ्रमात होते, पण आता त्यांनाही चांगलं प्रशासन मिळणार आहे, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केलाय. 

नाशिकनं मनसेला पहिला महापौर दिला. भाजपच्या पाठिंब्याच्या जोरावर मनसेचे अॅड. यतीन वाघ यांनी महापौर म्हणून सत्ता काबीज केली. मात्र आता अडीच वर्षानंतर, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर, पंचगंगेच्या घाटाखालून बरंच पाणी वाहून गेलं. येत्या 12 सप्टेंबरला नाशिक महापौरपदाची निवडणूक होणार आहे. मात्र त्याआधीच भाजपनं मनसेची साथ सोडलीय आणि मित्रपक्ष शिवसेनेचा हात पुन्हा एकदा हातात घेतलाय.

राज ठाकरेंच्या मनसेनं स्थायी समिती अध्यक्षपद देण्याचा शब्द न पाळल्यानं नाराज भाजपनं हा निर्णय घेतला... आता शिवसेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर असं युतीचं समीकरण ठरलंय... मनसेनं विश्वासघात केल्याची आणि नाशिकचं नवनिर्माण करण्यात ते अपयशी ठरल्याची टीका भाजप नेत्यांनी केलीय..  

अचानक झालेल्या या उलथापालथीनं नाशिक महापौरपदाच्या निवडणुकीत आणखीच चुरस निर्माण झालीय. नाशिक महापालिकेत मनसेचे 39, शिवसेना आरपीआयचे 23, राष्ट्रवादीचे 20, भाजपचे 15, तर काँग्रेस, अन्य पक्ष आणि अपक्ष 25 असं संख्याबळ आहे.

मनसेच्यावतीनं शशिकांत जाधव, सुदाम कोंबडे, सलीम शेख आणि अशोक मुर्तडक अशा चौघांनी महापौर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले. त्यानंतर थोड्याच वेळात शिवसेना, भाजप आणि आरपीआय महायुतीच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करत महापालिकेत शक्तिप्रदर्शन केलं. शिवसेनेच्या वतीनं सुधाकर बडगुजर, काँग्रेसतर्फे उद्धव निमसे, राष्ट्रवादीतर्फे विक्रांत मते आणि अपक्षांच्या वतीनं संजय चव्हाण यांनीही महापौरपदासाठी अर्ज भरलेत. तर उपमहापौरपदासाठी मनसेचे अशोक सातभाई, भाजपचे संभाजी मोरूस्कर, काँग्रेसचे लक्ष्मण जायभावे, राष्ट्रवादीचे सुनीता निमसे आणि सुफी जीन, अपक्षांच्यावतीनं गुरमित बग्गा हे रेसमध्ये आहेत.

मनसेच्या हाती असलेली ही राज्यातली एकमेव महापालिका आहे. त्यामुळं नाशिकची सत्ता टिकवण्यासाठी मनसेनं राष्ट्रवादीच्या 20 नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केलेत. मनसेनं आपल्या नगरसेवकांना उदयपूरला सहलीला पाठवून दिलंय. राष्ट्रवादीचे नगरसेवक लोणावळ्यात पिकनिकला गेलेत. काँग्रेसनं अजून आपले पत्ते ओपन केलेले नाहीत. पण त्यांचेही सर्व नगरसेवक सापुता-याला रवाना झालेत. आता पडद्याआडून कोण कुणाची मदत घेतो, कोण कुणाचे नगरसेवक फोडतो आणि कितीजणांना गैरहजर राहण्यास भाग पाडलं जातं, यावर नाशिकचा महापौर ठरणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.