पुढे : ढोल ताशाचा गजर आणि गणपती बाप्पा मोरया चा जयघोष अशा उत्साही वातावरणात पुण्यातल्या मानाच्या गणपतींचं आगमन झालं… आता पुढचे दहा दिवस पुणं गणपतीमय झालं असणार आहे.
मानाचा पहिला गणपती - कसबा गणपती
परंपरेनुसार याहीवर्षी कसबा गणपतीचं फुलांनी सजवलेल्या पालखीतून आगमन झालं. पुण्याचं कुलदैवत असलेल्या कसबा गणपती मंदिरापासून पालखीची मिरवणूक निघाली. हमालवाड्यातून श्रींची मूर्ती घेऊन निघालेली पालखी मिरवणूक लक्ष्मी रस्ता, अप्पा बळवंत चौक, मार्गे उत्सव मंडपापर्यंत पोचली. ढोल ताशा तसेच ब्यांड पथकांचा मिरवणुकीत सहभाग होता. सकाळी ११ वाजून १६ मिनिटांच्या मुहूर्तावर गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
मानाचा दुसरा गणपती - तांबडी जोगेश्वरी गणपती
तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता… इथल्या गणेशोत्सवाला धार्मिक तसेच अध्यात्मिक महत्व आहे. मूर्तिकार मंजुळकर यांच्या घरापासून बाप्पाची मिरवणूक निघाली. पारंपारिक नगारा, ढोल ताशा तसेच बँडच्या साथीत मिरवणूक कुमटेकर चौक, लक्ष्मी रस्ता मार्गे उत्सव मंडपापर्यंत पोचली. दुपारी साडेबारा वाजता तांबडी जोगेश्वरी गणपतीची प्रतिष्ठापना झाली.
मानाचा तिसरा गणपती- गुरुजी तालीम
गुरुजी तालीम मंडळाच्या बाप्पाची मिरवणूक फुलांनी सजवलेल्या रथातून काढण्यात आली. शितळादेवी मंदिरापासून निघालेली मिरवणूक अप्पा बळवंत चौक, बेलबाग मार्गे उत्सव मंडपात पोचली. ढोल ताशा तसेच ब्यांड पथक ही या मिरवणुकीची वैशिष्ट्ये होती. सकाळी साडे अकराच्या दरम्यान गुरुजी तालीम मंडळाच्या बाप्पाची प्रतिष्ठापना झाली.
मानाचा चौथा गणपती - तुळशीबाग गणपती
गणपती बाप्पाची भव्य आणि सुरेख मूर्ती हे तुळशीबाग मंडळाच्या बाप्पाचं वैशिष्ट्य. मंडईतील टिळक पुतळ्यापासून तुळशीबाग गणपतीची मिरवणूक निघाली. शनिपार, गणपती चौक, लक्ष्मी रस्ता मार्गे मिरवणूक उत्सव मंडपात पोहोचली. ढोल ताशा पथक तसेच नगारा वादन ही या मिरवणुकीची वैशिष्ट्ये. दुपारी साडेबारा वाजता तुळशीबाग गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
मानाचा पाचवा गणपती - केसरीवाडा गणपती
केसरीवाडा गणपतीचं आगमनही भव्य मिरवणुकीनं झालं. चांदीच्या पालखीतून ही मिरवणूक निघाली. रमणबाग प्रशालेपासून निघालेली मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात केसरीवाड्यात पोचली. सकाळी ११ च्या दरम्यान केसरीवाडा गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.