अखिलेश हळवे, नागपूर : 'एडस'सारख्या गंभीर रोगाबाबत नागपूरकरांमध्ये जनजागृती करण्यासाठी नागपूर महापालिकेनं अजब-गजब उपाय शोधलाय.
'नैतिकता पाळा, एड्स टाळा...' एड्स जनजागृतीसाठीचं हे लोकप्रिय ब्रीदवाक्य... मात्र त्यात आता थोडी सुधारणा करायला हरकत नाही... 'मारूती स्तोत्र वाचा, एड्स टाळा...' आता ही काय नवी भानगड, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल...
'जागतिक आरोग्य दिना'निमित्त येत्या ७ एप्रिलला नागपूरच्या कस्तुरचंद पार्कमध्ये पालिकेनं जंगी कार्यक्रम आयोजित केलाय. मारूती स्तोत्र पठनाचा... एड्स रोगाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी एक लाख हनुमान-भक्तांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंदणी व्हावी, यासाठीदेखील पालिकेच्या खटपटी सुरू होत्या.
मात्र, त्याविरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलीय. या कार्यक्रमासाठी ५० लाख रुपयाचा निधी खर्च करण्याचं कारण काय, असा आक्षेप याचिकेत घेण्यात आलाय.
याची गंभीर दखल घेत, न्यायालयानं आयोजक महापालिकेवर गंभीर ताशेरे ओढले. एड्स जनजागृती कार्यक्रमाचा हनुमान स्तोत्राच्या पठनाशी संबंध काय? असा सवाल कोर्टानं केलाय. मारूती स्तोत्र पठनाचा खर्च पालिकेनं करणं अयोग्य आहे, असंही न्या. भूषण गवई आणि न्या. सपना जोशी यांच्या खंडपीठानं म्हटलंय.
यामुळं सत्ताधारी पक्षाची चांगलीच कोंडी झालीय. स्तोत्र पठण कार्यक्रमाचा खर्च आता नागपूरच्या पोद्दारेश्वर राम मंदिरातर्फे केला जाणार आहे.
एड्स जनजागृतीसाठीचा महापालिकेचा हा रामबाण उपाय वादग्रस्त ठरलाय. निदान यापुढं असे अकलेचे तारे नागपूरमधील सत्ताधारी मंडळी तोडणार नाहीत, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.