नागपूर : हिवाळी अधिवेशनात आज चर्चा रंगली होती ती 'वजनदार' मंत्री आणि आमदारांची... कोण आहेत हे वजनदार राजकारणी? त्यांचं काय चाललंय? चला पाहूयात, हा खास रिपोर्ट.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय वजन चांगलंच वाढले आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष बनल्यानं, मुख्यमंत्र्यांच्या अंगावर आणखी मूठभर मांस चढले. पण बुधवारी त्यांची धडपड दिसली ती आपलं वजन कमी करण्यासाठी. केवळ मुख्यमंत्रीच नाही, तर इतर अनेक वजनदार आमदारांचाही खटाटोप होता तो शारिरीक वजन नियंत्रणात आणण्यासाठी.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वजनदार नावाच्या मराठी सिनेमात सई ताम्हणकर आणि प्रिया बापट या दोघी वजन घटवताना दिसल्या. त्यांचाच कित्ता मंत्री आणि आमदारांनी गिरवला तो नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात. त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिरात. त्यासाठी खास लठ्ठपणा हटाव अभियान सुरू करण्यात आलं असून, तब्बल 28 किलो वजन कमी करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच अभियानाचं ब्रँड अँबॅसिडर बनवण्यात आलंय.
मुख्यमंत्री फडणवीसांनी आपला लठ्ठपणा नेमका कसा कमी केला, याचं रहस्य जाणून घेण्यासाठी आम्ही गाठलं ओबेसिटी सर्जन डॉ. जयश्री तोडकर यांना. आपलं राजकीय वजन वाढवण्यासाठी खटाटोप करणारे राजकारणी, एकमेकांशी लढण्यातच धन्यता मानणारे राजकारणी, आता चक्क लठ्ठपणाशी लढा देण्यासाठी सज्ज झालेत.