कोल्हापूर : 'नकोशी' या नावातच हे नाव का ठेवलयं ते कळतं... पण कोल्हापूरच्या एका 'नकोशी'ला आज नवीन ओळख मिळालीय... जणू पुर्नजन्म झाल्यागत तिला आनंद झालाय.
कोल्हापुरातल्या शिरोली गावातलं कुंभार कुटुंबातली ही गोष्ट... त्यांच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य... मोलमजुरी करुन ते कुटुंबाची गुजराण करतात... वंशाला दिवा मिळावा अशी कुंभार कुटुंबाची इच्छा... मात्र त्यांच्या कुटुंबात पहिली... दुसरी... तिसरी... आणि चौथीही मुलगीच जन्मली... पाचव्यांदा तरी वंशाला दिवा मिळेल अशी कुंभार कुटुंबाला वाटलं होतं... पण पाचवीही मुलगी झाली.
त्यामुळे कुंभार दाम्पत्यानं नाराजीनं त्या मुलीचं नाव ठेवलं 'नकोशी'... तेव्हापासून ते आजपर्यंत नकोशी आपल्याला नको असणाऱ्या नावाचं ओझं घेऊन जगत होती. लहानपणी तिला नकोशी नावाचा अर्थही समजत नव्हता. सहावी, सातवीत असताना तिला नकोशीचा अर्थ समजला त्यावेळी ती खूप नाराज झाली.
दरम्यानच्या काळात तिच्या वडिलांचं निधन झालं. पण त्यातून सावरत नकोशीनं आपलं नाव कल्याणी करुन घ्यायचं ठरवलं... तेव्हापासून ती आपलं नाव बदलावं यासाठी प्रयत्न करत होती... आणि अखेर तिच्या प्रयत्नांना यश आलं... राजर्षी शाहू कॉलेजच्या पुढाकारानं बारावीत शिकणाऱ्या 'नकोशी'च्या नाव बदलाचा कार्यक्रम ठेवला... नकोशीचं नाव बदलून कल्याणी ठेवण्यात आलं... त्यामुळं आपला जणू पुनर्जन्म झाल्यासारखं तिला वाटतंय.
कल्याणीची मोठी बहीण स्वाती कुंभारही या कार्यक्रमाला हजर होती. तिलाही कल्याणीचं नकोशी नाव लहानपणापासून खटकत असायचं... नाव बदलल्यामुळं आता स्वातीलाही खूप आनंद झालाय.
कल्याणीच्या नाव बदलण्याच्या इच्छाशक्तीमुळे शिक्षकांनीही तिला याप्रकरणी खूप मदत केली. कल्याणीला खूप शिकायचंय... त्यासाठी कॉलेज सदैव तिच्या मागे असेल अशी हमी तिचे शिक्षक प्रा. सिंधु आवळे यांनी दिलंय.
मुलगाच नाही तर मुलगीही वंशाचं नाव उज्ज्वल करु शकते. त्यामुळं यापुढं आपल्यासारखं कुणाही मुलीच्या वाट्याला नकोशी नाव येऊ नये, एवढीच कल्याणीची इच्छा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.