नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या आठवड्यामध्ये मातोश्रीवर गेले आणि उद्धव ठाकरेंना भेटले. या भेटीवर राज ठाकरेंना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आहे. जयदेव-उद्धव यांचा वाद मिटवण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर भेटीला गेल्याच्या चर्चा सुरु होत्या.
उद्धव आणि जयदेव यांच्या वादामध्ये मला पडायचं नाही, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. हे बोलतानाच राज ठाकरेंनी सूचक वक्तव्य केलं आहे. बाळासाहेबांनी मृत्यूपत्र स्वेच्छेनं नाही तर उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे केलं असल्याचा आरोप जयदेव ठाकरेंचा आहे, यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
या सुनावणीवेळी आपला दावा बळकट करण्यासाठी जयदेव ठाकरेंच्या वकिलांनी राज ठाकरेंची जुन्या भाषणांची सीडी कोर्टात सादर केली आहे. या सीडीमुळे आता राज ठाकरेंना साक्षीदार बनवण्याची शक्यता आहे. मी भाषणात बोललो ते खरं आहे, मला कोर्टात जायची सवयच आहे, असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं आहे.