रत्नागिरी: राज्याच्या इतर भागाप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात काही गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवायला लागलीय. काही गावांमध्ये प्रशासनाकडून पाण्याचे टँकरही सुरू झाले आहेत. 23 गावांतल्या 40 वाड्यांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र जिथे टँकरद्वारे पाणी नाही तिथे महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. संगमेश्वर तालुक्यातली स्थिती गंभीर आहे.
संगमेश्वर तालुक्यातल्या चाफवली गावातल्या भोयरेवाडीतल्या महिलांना पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वणवण करावी लागतेय. पाच वर्षांपूर्वी जलस्वराज्य नळपाणी योजनेतून फक्त तीन आठवडे भोयरेवाडीत पाणी आलं. मात्र काही तांत्रिक कारणानं बंद पडलेल्या या योजनेचं पाणी काही आलेलं नाही. त्यामुळे जवळपास 200 वस्ती असलेल्या भोयरेवाडीला 2 किलोमीटरवरच्या झऱ्यावर अवलंबून राहावं लागत आहे. मात्र झऱ्याचं पाणी डिसेंबरनंतर मोठ्या प्रमाणात आटतं.. मध्यरात्री दोन वाजता झऱ्यावर यावं लागतं... मग चार तासांनी इथे नंबर लागतो.
माणसांना प्यायला पाणी नाही... तर जनावरांना कुठून पाणी मिळणार असा प्रश्न ग्रामस्थांना पडलाय. जिल्ह्यातल्या 156 गावांतल्या 640 वाड्या पाणीटंचाईने होरपळल्या आहेत. पण अजून टँकरने पुरवठा सुरू झालेला नाही.
भोयरेवाडीला मिळालेली नळपाणी योजना कामांतल्या त्रुटींमुळे बंद झाली. मात्र सरकारी अधिकारी योजना सुरू करण्याची आश्वासनंच देतायत.
संगमेश्वर तालुक्यात खरं म्हणजे जिल्ह्यातला सर्वाधिक पाऊस पडतो. पण उन्हाळ्यात हाच तालुका सर्वाधिक कोरडा असतो. टँकरने पुरवठा, नळपाणी योजना अशी सरकारी छापाची फक्त स्वप्न ग्रामस्थांना दाखवली जातात, पण प्रत्यक्षात ग्रामस्थांच्या नशिबी पाण्यासाठी वणवणच येते. स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी याबाबत संवेदनशीलता दाखवायला हवी.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.