मुकुल कुलकर्णी, झी मीडिया नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षांतर्गत स्वच्छता मोहीम हाती घेतलीय.. गुन्हेगारी पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांच नाही तर त्यांना पक्षात आवताण धाडणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा पवारांनी दिलाय. छबु नागरेच्या कारवाईतून थेट भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांवर हल्ला चढविल्याचे बोलले जातंय..
आगामी महानगर पालिका निवडणुकांची मोर्चेबांधणी करण्यासाठी, पक्षाची ध्येय धोरणे ठरविण्यासाठी पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थिती गुरुवारी नाशिक मध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला.. मात्र ह्या संपूर्ण मेळाव्याच्या केंद्रस्थानी होता बनावट नोटा छापणारा छबु नागरे.. भाजप सरकारच्या आक्रमक प्रचार मोहिमेसमोर यांर्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कितपत निभाव लागतो, त्यातही पक्षाची बदनामी होणारे पदाधिकारी जवळ बाळगले तर जे काय एक यश मिळणार ते ही हातातून निघून जाईल की काय ही धास्ती असल्याने पवार साहेबांनी कार्यकर्त्यांना चारित्र्याचे धडे दिले..
छबु नागरे सारख्या प्रवृतीना पक्षात या पुढे थारा नाही. त्याला तर कायदेशीर शिक्षा झालीच पाहिजे मात्र असे रत्न पक्षात कोणी आणले त्यांचावारही कारवाई करण्याचे जाहीर आदेश शरद पवारांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यान दिलेत. पवारांच्या या इशाराने अनेकांच्या भुवया उंचावल्यात..
छबु नागरे हा भुजबळ समर्थक म्हणून ओळखला जातो. समीर भुजबळ खासदार असतानाच छबुच पक्षातील वजन वाढले होते. एकीकडे पवार साहेब छोट्यात छोट्या कार्यकर्त्याचे नाव लक्षात ठेवतात .त्याची पार्श्वभूमीवर त्यांना माहित असते मग छबु विषयी त्यांनी माहिती घेतली नसेल का असा सवाल उपस्थित होत असून, नोटा छापणाऱ्या या रत्नाच्या नथीतून थेट भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांवर रोख धरल्याच राजकीय विश्लेषकांचे निरिक्षण आहे.
शरद पवारांच्या दौऱ्या दरम्यान ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या काही होर्डिंगवर छगन भुजबळांना स्थान नव्हते. दौऱ्या दरम्यान भुजबळ समर्थकांची संख्याही नजरेत भरणारी नव्हती. पक्षाची प्रतिमा सुधारून स्वच्छ चरित्र असणारे उमेदवार शोधण्याचे आदेश देण्यात आलेत. आगामी निवडणुकीची सर्व सूत्र आपल्या हाती घेऊन नवा गडी नव्या चाली खेळण्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा दिसत असल्याचे बोललं जातंय, मात्र एक से एक रत्न शोधून आणणाऱ्या हेविवेट नेत्यांवर बेरजेच राजकारण करणारा राष्ट्रवादी पक्ष कारवाई करणार का हा प्रश अनुत्तरीत आहे.