जळगाव : गरीब घरात जन्माला आलेल्या एका मुलाला, वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी आपला जीव धोक्यात घालून एखाद्याला वाचवण्याची प्रेरणा कुठून येत असेल? मुक्ताईनगरच्या निलेश भिल या बालवीराची ही यशोगाथा.
निलेश भिल हा जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगरच्या कोथळी गाव शिवारात, एका कुडाच्या झोपडीत राहणारा. चौथीत शिकणाऱ्या निलेशची शौर्यगाथा अंगावर शहारा आणणारी आहे.
३० ऑगस्ट २०१४ रोजी घडलेली ही घटना. बुलडाणा जिल्ह्यातून घोगले कुटुंबीय मुक्ताईच्या दर्शनासाठी इथं आलं होतं. पूर्णा नदीकाठी फिरत असताना या कुटुंबातला ११ वर्षांचा भागवत पाय घसरून पडला. त्याच्या आईनं आरडाओरडा सुरू केला. मात्र कुटुंबातल्या कुणालाच पोहता येत नसल्यानं भागवतला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेण्याची हिंमत कुणीच दाखवली नाही.
त्याच वेळी अवघ्या १० वर्षांचा निलेश मुक्ताई मंदिराबाहेर जेवत होता. गोंगाट ऐकून त्यानं पान बाजुला सारलं. नदीच्या दिशेनं धाव घेतली आणि क्षणाचाही विलंब न लावला पूर्णेच्या पात्रात उडी घेतली. त्यानं भागवतला सुखरूप बाहेर काढलं.
भागवतच्या आईच्या जागेवर आपल्याला आपलीच आई दिसली, म्हणून मी विचार न करता पाण्यात उडी घेतल्याचं निलेश सांगतो.
निलेशचे आई वडील मोलमजुरी करतात. जंगलात वास्तव्य असल्यामुळे पोहणं नैसर्गिक असलं, तरी एखाद्याला वाचवण्यासाठी उडी घेण्याचं धाडस अंगी हवंच. त्याच्या या पराक्रमाचा त्याच्या आईला आणि त्याच्या जिल्हा परिषद शाळेला रास्त अभिमान आहे.
भविष्यात काय व्हायचंय, यावर निलेशचं उत्तर आहे राजकारणात जायचंय. मंत्री बनायचंय, देशाला पुढे न्यायचंय, दुसऱ्यासाठी स्वतःला प्रवाहात झोकून देणाऱ्या नेत्यांचीच आज देशाला गरज आहे. त्याच्या स्वप्नपूर्तीला शुभेच्छा.