वर्धा : अर्थ, नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीविषयी भाजपची भूमिका बदललेली नाही. मी स्वतः आणि भाजपही वेगळ्या विदर्भ राज्याच्या बाजूनेच असल्याचं म्हटलं आहे.
वेगळ्या विदर्भाची मागणी ही भावनिक नाही. ती वास्तववादी, भौगोलिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्व अंगाने आहे. जनसंघाच्या १९५२ ला झालेल्या अधिवेशनात तसा ठराव घेण्यात आला होता, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनीही विदर्भ राज्याच्या बाजूने मत मांडले होते. विदर्भाची मागणी सर्व अंगाने विचार करूनच केली जात आहे.
विदर्भाचा विकास झाला पाहिजे, याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. विदर्भासोबत महाराष्ट्र आणि देशाचाही विकास झाला पाहिजे, असा विदर्भाच्या मातीचा स्वभाव आहे.
शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. शेतमालाला योग्य हमीभाव मिळालाच पाहिजे, याविषयी दुमत नाही; पण शेतकऱ्यांना शेती परवडेल, असे धोरण आम्हाला राबवायचे आहे.
विदर्भातील शेतीक्षेत्राच्या विकासाकरिता येत्या पाच वर्षांत ३५ हजार कोटी रुपयांचा आराखडा राज्य शासनाने तयार केला आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी लवकरच सुरू होणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्धार केला आहे. वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांत दारूबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, याकरिता यंत्रणा उभी केली जाईल. त्यासाठी चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचंही मुनगंटीवार यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.