पुणे : पुण्यात एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने आत्महत्या केली आहे. अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या नवऱ्यानं तिचा पैशासाठी छळ केला असा आरोप होतोय, आत्महत्या केलेल्या २८ वर्षाच्या तरुणीचं नाव चमेली अमित गुटाळ असं आहे. चमेलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
चमेलीचा २०१५ मध्ये अमित गुटाळशी विवाह झाला, ती एक स्वतः एका सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनिअर होती. चमेलीने अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी, माहेरुन पैसे आणावेत अशी मागणी अमितनं केली. त्यासाठी त्यानं चमेलीचा मानसिक छळ केल्याचा आरोप आहे.
चमेलीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबद्दल अमित गुटाळ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित पैशांसाठी चमेलीकडे तगादा लावायचा, त्याचप्रमाणे तिच्या चारित्र्यावर संशयही घ्यायचा, असा आरोप होत आहे. चमेलीच्या आत्महत्येनंतर तिच्या भावानं सहकारनगर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार केली होती.