www.24taas.com, मुंबई
आदर्श घोटाळा उघड झाल्यामुळं आदर्शमधील फ्लॅटधारकांना आता आपल्या चूका उमजू लागल्यात. विधानसभेचे अध्यक्षपद भुषवलेले आणि आदर्शचे एक फ्लॅटधारक बाबासाहेब कुपेकरांनीही याप्रकरणी आपला कबुलनामा आदर्श चौकशी आयोगासमोर ठेवला. आदर्शमध्ये फ्लॅट घेणं ही माझी चूक होती. अशा शब्दांत त्यांनी चूक कबूल केली. प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याची कबुलीही त्यांनी दिली. प्रतिज्ञापत्रात खोटे उत्पन्न दाखवले होते. तसंच मुंबईत फ्लॅट असल्याचं त्यांनी लपवलं होतं, असंही त्यांनी म्हटलंय.
आदर्श सोसायटीच्या सभासदत्वासाठी अर्ज करतेवेळी आपल्याकडे सरकारी कोट्यातून पवई येथे पाचशे चौरस फुटांचा फ्लॅट होता. ‘आदर्श’च्या सभासदत्वासाठी अर्ज करतेवेळी आपल्या मालकीचा सरकारी फ्लॅट विकणार असल्याचं आपण तत्कालीन मुख्यमंत्री विलसाराव देशमुख यांना कळवलं होतं. तसंच सोसायटीचे प्रवर्तक कन्हैय्यालाल गिडवानी यांनाही आपण याबाबत कल्पना दिली होती. मात्र, सोसायटीचं सदस्यत्व मिळण्यास अद्याप दोन-तीन वर्षे लागतील, असं गिडवानी यांनी सांगून आदर्शच्या सदस्यत्वासाठी अर्ज करायला हरकत नसल्याचं म्हटलं होतं, असं बाबासाहेब कुपेकर यांनी आपली बाजू स्पष्ट करताना सांगितलं. पवईतला फ्लॅट विकण्याचा निर्णय बारगळल्यानंतर आपण हा फ्लॅट आपली मुलगी सुनेत्रा राजेंद्र चव्हाण हीच्या नावावर केल्याचं कुपेकरांनी म्हटलंय.
.