www.24taas.com, मुंबई
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांचा अतीवेग आणि मानवी चुका या बाबी प्रामुख्याने जीवघेण्या ठरत आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे मुंबई-पुणे ही महत्वाची शहरं अवघ्या काही तासांच्या अंतरांनी जोडली गेली. मात्र वाहनांचा अतिवेग आणि मानवी चुकांमुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनलाय.
महामार्गावर दरवर्षी सरासरी दीड हजार अपघात होतात. 2012 मध्ये 1147 अपघात झाले असून त्यात 70 जणांचा मृत्यू झालाय. तर 29 जण गंभीर जखमी झालेत. तसंच त्याआधी या महामार्गाने एकाच रात्रीत 27 जणांचे बळी घेतले आहेत. आणि नुकतंच डिसेंबरमध्ये याच महामार्गावर अभिनेते आनंद अंभ्यकर आणि अक्षय पेंडसे यांचा अपघातात मृत्यू झाला आणि त्यानंतर रस्त्याच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. दररोज तीस हजारांहून गाड्यांची वर्दळ असलेल्या या महामार्गावर बहुतांश वाहनं सुसाट जातात. मात्र, वेगमर्यादेचा भंग करणा-या अशा वाहनांवर कारवाईच होत नसल्याचं दिसून येतंय. या महामार्गावरील बहुसंख्य अपघातास बेफाम वाहनंच जबाबदार असल्याचं स्पष्ट होऊनही वर्षभरात केवळ 294 वाहनचालकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत.
या महामार्गाची देखभाल दुरुस्ती करणारी आयआरबी कंपनी आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी ८0 टक्के अपघात मानवी चुकीमुळे होत असल्याचे जाहीर केलंय. त्यामुळे महामार्गाच्या सुरक्षेसाठी नियमितपणे सुरक्षा ऑडिट गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अपघात निवारण समितीच्या सुचनांची अंमलबजावणीही आवश्यिक आहे. परंतु यापैकी कुठल्याच बाबी आजवर गांभीर्यानं घेतल्या जात नसल्याचं स्पष्ट झालंय. वाहतुकीचे नियमही या महामार्गावर पाळले जात नाही. त्यामुळे प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही रस्ते वाहतुकीच्यावेळी काळजी घेणं अपेक्षित आहे.