मुंबई : तर मुंबईतल्या वेगवेगळ्या दहीहंडी उत्सवात आतापर्यंत ९४ गोविंदा जखमी झालेत....यातले ६७ जखमी गोविंदांना उपचारासाठी केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत. तर सायन हॉस्पिटलमध्ये १६ जखमी गोविंदावर उपचार सुरू आहेत. नायर हॉ़स्पिटमध्येही ११ गोविंदाला दाखल कऱण्यात आलंय. तर ठाण्यातही सात गोविंदा जखमी झाले आहेत.
मुंबई, ठाण्यात लाखमोलाचे 'लोणी' मिळवण्यासाठी थरांवर थर रचून दहीहंडी उत्सव साजरा केला जात असतानाच या नादात आत्तापर्यंत ९४ गोविंदा जखमी झाले आहे. जखमी गोविंदावर मुंबईतील नायर, सायन आणि केईएम आणि इतर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
‘बोल बजरंग बली की जय’, असं म्हणत ढाक्कुमाक्कुमच्या तालावर मुंबई, ठाण्यात दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. सुप्रीम कोर्टानं निर्बंध हटवल्यामुळं गोविंदा पथकांमधील थरांची स्पर्धा यंदाही कायम असून आयोजकही गोविंदा पथकांना लाखो रुपयांचं आमीष दाखवत त्यांना आकर्षित करत आहेत. मात्र थरांची ही स्पर्धा गोविंदा पथकांसाठी पुन्हा एकदा वेदनादायीच ठरली आहे. मुंबईतील विविध ठिकाणी थरांवरुन कोसळून आत्तापर्यंत ९४ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मुंबईतील केईएम, सायन आणि नायर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठानची दहीहंडी सालाबादप्रमाणं यंदाही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. या दहीहंडीमध्ये स्पेनहून आलेल्या तरुणांनी सात थरांची सलामी देत उपस्थितांची वाहवा मिळवली. तर आ. प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठाननं साधेपणानं दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे.
घाटकोपरमध्ये राम कदम यांनी तर वरळीत सचिन आहीर यांनी दहीहंडीचं आयोजन केलंय. या दहीहंडीमध्ये मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी हजेरी लावत आहे. सुप्रीम कोर्टानं सेफ्टी बेल्टचा वापर करणं, आयोजनस्थळी मऊ गाद्यांवर दहीहंडीसाठी थर लावणं बंधनकारक केलं आहे. मात्र बहुतांशी ठिकाणी या नियमांचं पालन करण्यात आलेलं नाही.
ठाण्यातील खासदार राजन विचारे यांची दहीहंडी याला अपवाद ठरली आहे. विचारे यांनी आयोजन ठिकाणी मॅट उपलब्ध करुन दिली आहे. १२ वर्षांखालील बाल गोविंदाना थरावर चढण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमाचं काटेकोरपणे पालन होत आहे की नाही यावर पोलीस करडी नजर ठेवून आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.