www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
समाजातील अंधश्रद्धेविरूद्ध लढणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर अखेर महाराष्ट्र सरकारला जाग आलीय. गेल्या 18 वर्षांपासून रखडलेल्या जादूटोणा विरोधी विधेयकासंदर्भात वटहुकूम काढण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय. तर शिवसेना, भाजप या राजकीय पक्षांसोबतच वारक-यांनी मात्र या विधेयकाला असलेली विरोधाची भूमिका कायम ठेवलीय.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या आणि अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक तातडीने संमत करा, अशी मागणी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
जादूटोणाविरोधी विधेयकाबाबत वटहुकूम जारी करण्याचं सरकारने ठरवलं असलं तरीही आपला या विधेयकाला विरोधच राहील असं सनातन संस्थेने स्पष्ट केलंय. राज्यपालांना भेटून विरोध व्यक्त करणार असल्याचं सनासन संस्थेने स्पष्ट केलंय.
जादूटोणा विरोधी विधेयकाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचं ज्येष्ठ शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. अनिष्ठ प्रथा रोखण्यासाठी स्वतंत्र विधेयक आणण्याऐवजी इंडियन पीनल कोडमध्ये सुधारणा कराव्यात, अशी मागणी रावतेंनी केलीय
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.